मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता थेट बदल्या करायच्या. मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द करून एकप्रकारे मंत्र्यांना तडाखा द्यायचा. मग शरद पवार यांनी मध्यस्थी करायची. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून घडलेला घटनाक्रम कुरघोडी आणि संवादहीनतेचा परिपाक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन सत्ताकेंद्रे निर्माण झाल्यास राज्याचे भले होणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. यामुळे अधिकारी वर्गात बेशिस्तपणा वाढून समन्वय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बुधवारी नाशिक दौऱ्यात फडणवीस यांनी शहरातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्या आदी विषयांवरून त्यांनी  राज्य सरकारवर हल्ला चढविला. शिवसेनेच्या मुखपत्राच्या भूमिकेतच अंतर्विरोध असून सध्या ते ‘चलने दो’च्या तत्त्वावर काम करते, असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीसारख्या महानगरात दररोज २८ हजार चाचण्या घेतल्या जातात. मुंबईत सध्या हे प्रमाण केवळ ३३०० चाचण्या इतके आहे. मंगळवारी मुंबईत दिवसभरात करोनाचे ८०६ रुग्ण आढळून आले. ही संख्या कमी होण्यामागे अल्प चाचण्या हे कारण आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची चाचणी बंधनकारक आहे. परंतु, रुग्णांची संख्या कमी दिसण्यासाठी तपासण्या वाढविल्या जात नाहीत. मुंबईत दररोज किमान २५ हजार चाचण्या होण्याची गरज आहे. सध्याची स्थिती मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात टाकणारी असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

मुंबई महापालिकेने चाचण्यांची जबाबदारी नागरिकांवर टाकली आहे. ज्यांना वाटते त्यांनी येऊन चाचणी करावी, हे महापालिकेचे आवाहन त्याचाच एक भाग आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. खासगी रुग्णालयांसाठी शासनाने काढलेल्या आदेशात काय घेता येईल आणि काय घेता येणार नाही याची यादी समाविष्ट केली. त्यामध्ये काय घेता येणार नाही याची लांबलचक यादी आहे. त्याचा गैरफायदा खासगी रुग्णालये घेत असून शासनाने यामध्ये स्पष्टता आणण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.