महाअंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहण काळात त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. या प्रकारास जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सूर्यग्रहण हा सावल्यांचा खेळ असून त्याला खगोलीय कारणे आहेत. याचा दैनंदिन जीवनावर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, या विषयी वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी ग्रहण काळात भाजी चिरणे, जेवण करणे अशी नेहमीची कामे केली. त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र याउलट परिस्थिती राहिली. धार्मिकदृष्टय़ा ग्रहण काळात येणारे मालिन्य टाळण्याचा दावा करीत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात स्नानासाठी अनेकांनी गर्दी केली. गंमत म्हणजे, या कालावधीत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा ग्रहण काळात बंद ठेवला होता.

ग्रहण सुटल्यानंतर टप्प्याटप्प्याने साडेअकरानंतर पाणीपुरवठा करण्यात आला. या कृतीचे नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून समर्थन करण्यात आले. या कृतीवर महाअंनिसने आक्षेप घेतला आहे. त्र्यंबकेश्वर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र मानले जाते. पण श्रद्धेच्या नावाखाली लोकांमध्ये अंधश्रद्धा रुजविणे, वाढविणे आणि त्यातून शोषण व दहशत निर्माण करणे असे काही प्रकार घडत असल्याचा दावा महाअंनिसने केला आहे. नगरपालिकेनेही अशा अनिष्ठ अवैज्ञानिक कृतींचे समर्थन करावे, ही बाब जादूटोणाविरोधी कायद्याचा भंग करणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित पदाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अवैज्ञानिक कृतीचे खुलासे मागविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य समन्वयक कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे आदी उपस्थित होते.