जळगाव : महावितरणने नवीन टीओडी मीटर बसविल्यानंतर वीजबिल पूर्वी पेक्षा जास्त येत असल्याची तक्रार तालुक्यातील जळके येथील एका ग्राहकाने जळगाव ग्रामीण उपविभागाकडे केली होती. त्यानुसार, तक्रारीची खात्री करण्यासाठी महावितरणचे पाच कर्मचारी गेल्यावर मात्र संबंधित ग्राहकाने त्यांना धक्काबुक्की केली. तसेच परिसरातील १२ गावांचा वीज पुरवठा संतापाच्या भरात जवळपास तासभर बंद पाडला. या प्रकरणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात त्या ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव परिमंडलात मागील काही दिवसांपासून टीओडी (टाईम ऑफ डे) वीज मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या नवीन वीज मीटरमुळे अनेक वीज ग्राहकांचे वीजबिल अचानक दुप्पट ते तिप्पट येऊ लागल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त बिल आल्याने ग्राहक संतप्त झाले असून यापेक्षा आपले जुने मीटरच बरे होते, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. महावितरणकडे वाढीव वीजबिलांबाबत शेकडो तक्रारी दाखल होत आहेत. नागरिक आपल्या पातळीवरून स्पष्टीकरण आणि दुरुस्तीची मागणी करत आहेत. अर्थात, या सगळ्या परिस्थितीचा संताप काही ग्राहकांच्या वागणुकीतूनही उफाळून येतो आहे. जळगाव तालुक्यातील जळके गावातील अशाच एका ग्राहकाने जास्तीच्या वीजबिलामुळे संतप्त होत थेट महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या घरात बसविण्यात आलेल्या टीओडी मीटरची तोडफोड केली.
तेवढ्यावरच न थांबता महावितरणच्या वावडदा येथे असलेल्या ११ केव्ही वीज उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीवर लोखंडी सळई फेकून मारली. ज्यामुळे परिसरातील जवळपास १२ गावांचा वीज पुरवठा बंद पडला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तब्बल तासभर वीजपुरवठा खंडीत झाला. जो सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. घडल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणच्या जळगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांच्या सूचनेवरून मंगळवारी दुपारी जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधित ग्राहकाच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या ग्राहकाच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
दरम्यान, नागरिकांनी टीओडी मीटर संदर्भात काही अडचणी असल्यास संयम बाळगून शांततेच्या मार्गाने तक्रारी कराव्यात. तक्रारींचे निरसन करण्यासाठी महावितरणे कर्मचारी प्रत्यक्ष मीटरची पाहणी करतील. ग्राहकांनी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. कायदा हातात घेऊन महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणच्या जळगाव ग्रामीण उपविभागाकडून आता करण्यात आले आहे.