नाशिक : शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांविरोधात नाशिक पोलिसांनी निर्णायक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. एकूण १३८ भोंगे शांततेत उतरविण्यात आले.
अनधिकृत भोंग्यांवर कारवाईसाठी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे प्रयत्नशील होत्या. विधानसभेत त्यांनी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत त्यांनी ‘भोंगा कोणत्याही धर्माचा भाग नाही’, आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर न्यायालयाने अमान्य केला आहे.’
याकडे लक्ष वेधले होते. राज्य सरकारने देखील या विषयावर कठोर भूमिका घेतली. यापुढे कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भोंग्यांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
आमदार फरांदे यांनी या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कारवाईस विलंब होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, अखेर नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला. पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोंगे उतरविण्याची मोठी कारवाई शांततेत आणि सामंजस्याने पार पाडली. या कारवाईत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७२, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६, इंदिरानगर पोलीस ठाणे १५ आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ असे एकूण १३८ भोंगे उतरविण्यात आल्याचे आमदार फरांदे यांनी म्हटले आहे.
मनसेच्या गोटात शांतता
धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्यांविरोधात मनसे काही वर्षांपासून आंदोलनात्मक पवित्रा घेत आहे. तीन वर्षांपूर्वी भोंग्याच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. प्रार्थनास्थळांजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेव्हा मनसेच्याा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
महापालिका निवडणुकीत अनधिकृत भोंग्यावरील कारवाई प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून भोंगे हटविण्याच्या कारवाईचे श्रेय घेण्याची पुरेपूर संधी साधली जात आहे. दुसरीकडे मनसेच्या गोटात मात्र शांतता असल्याचे चित्र आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विषयावर प्रारंभी आवाज उठवला होता. त्यानंतर नाशिकसह संपूर्ण राज्यात आंदोलने झाली होती.