जळगाव : ऑनलाइन रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी धुळे जिल्ह्यात काळे झेंडे दाखविण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी कोकाटे जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात अजित पवार गटाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मात्र, धुळ्यातील अनुभव लक्षात घेता ते चोपड्यात फिरकलेच नाहीत. तिकडे त्यांची वाट पाहत बसलेल्या पदाधिकाऱ्यांचीही फजिती झाली.
वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहाचे कामकाज चालू असताना भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत सध्या सगळीकडे गाजत आहे. विरोधकांनी त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत मंगळवारपर्यंत निर्णय होणार असल्याचे सूचक संकेत दिले आहेत. मंत्री कोकाटे हे शिंदखेडा तालुक्यात शुक्रवारी एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी आले होते. धुळे जिल्ह्यात आधीच महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील कांदा, कापूस उत्पादक संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्र्यांना कसा वेळ मिळतो, असा जाब त्यांना शरद पवार गटासह ठाकरे गटाने विचारला.
कोकाटे हे धुळ्यात थांबलेल्या हॉटेलच्या बाहेरही काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्र्यांची पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी हकालपट्टी करावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच त्यांना बराच वेळ हॉटेलच्या बाहेर पडू दिले नाही. शिंदखेडा तालुक्यातील पेट्रोल पंपाचे उद्घाटन पार पडल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे हे दुपारी साडेतीनच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहराकडे प्रस्थान करणार होते. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्कासो. शरश्चंदिका पाटील नाट्यगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गूण गौरव कार्यक्रमास ते उपस्थित राहणार होते. रात्री साडेसात वाजता चोपड्यातील कार्यक्रम आटोपून नंदुरबारकडे प्रस्थान करण्याचे त्यांचे नियोजन होते.
त्यानुसार, मंत्री कोकाटे यांच्या दौऱ्याचे नियोजन जळगाव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. परंतु, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातच महाविकास आघाडीच्या विरोधाला तोंड द्यावे लागल्याने, कृषिमंत्री कोकाटे यांनी चोपडा तालुक्याचा दौरा रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. कृषिमंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने चोपडा तालुक्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही वाटून झाल्या होत्या. प्रत्यक्षात, कृषिमंत्रीच कार्यक्रमाला येणार नाही म्हटल्यावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. इतर नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपण्यात आला. या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.