नाशिक– आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण उमेदवारीच्या अपेक्षेने पक्षनिष्ठा गुंडाळून सोईस्कर अशा पक्षात प्रवेश करण्यास प्राधान्य देत आहे. त्याचा सर्वाधिक फटका नाशिकमध्ये आतापर्यंत शिवसेनेला (उध्दव ठाकरे) बसला. ठाकरे गटाला पोखरणाऱ्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची नवलाईही आता संपत आली असून या गटात गेलेल्यांमध्ये सुरु असलेल्या रुसव्याफुगव्यांमुळे पदाधिकारी चांगलेच वैतागले आहेत. प्रारंभी शिंदे गटाविषयी गोडवे गाणारे आता जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटातील त्रुटी उघडपणे मांडल्यानंतर आता माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी त्यात भर टाकली आहे.
नाशिक महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचे ३५ संख्याबळ होते. शिवसेना दुभंगल्यापासून आतापर्यंत शिंदे गटासह भाजपमध्ये २८ माजी नगरसेवक गेले आहेत. अर्थातच शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एखाद्या पक्षात पदाधिकारी, नेत्यांची संख्या अधिक झाल्यावर जे होते, तेच होताना आता शिंदे गटात दिसत आहे. एकसंघ शिवसेनेलाही नाशिकमध्ये गटबाजीमुळे अनेकदा हाताशी आलेल्या यशाने हुलकावणी दिल्याचा इतिहास असताना शिंदे गटही सध्या त्याच वाटेने जात असल्याचे खुद्द काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पक्षातील गटबाजी नव्याने प्रवेश करणाऱ्यांना झेपेलच असे नाही. त्यांना पक्षात टिकाव धरायचा असल्यास कोणत्यातरी एका गटाचा आधार घेणे आलेच. मागील विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदार संघात काँग्रेसकडून डाॅ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्या हट्टालाच पेटल्या होत्या.
परंतु, महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने प्रारंभी अपक्ष उमेदवारीचा इशारा देणाऱ्या डाॅ. पाटील यांनी तेव्हा गप्प बसणे पसंत केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतु, अवघ्या दीड महिन्यातच त्या शिंदे गटातून बाहेर पडल्या. शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. परंतु, शिंदे गटातील गटबाजीमुळे संघटनात्मक कामे होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात असल्याने त्यातूनच पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती.
मागील लोकसभा निवडणुकीआधीपासून भाजपची ओढ असलेले माजी खासदार हेमंत गोडसे यांनी अलिकडेच शिंदे गटातील काही त्रुटींवर जाहीरपणे बोट ठेवले. प्रामुख्याने संघटन वाढीसाठी मंत्र्यांकडून फारसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोडसे यांची पाऊले भाजपच्या दिशेने पडल्याचे म्हटले जात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी एकेकाळी नाव असलेले माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनीही आता वेगळी भूमिका मांडली आहे. मामा ठाकरे यांच्याकडे एकेकाळी शिवसेनेची सिडको भागातील ओळख म्हणून पाहिले जात होते.
सिडकोत राहणारे कळवण,सटाणा, मालेगाव, देवळा तसेच धुळे, जळगाव या भागातील मतदार शिवसेनेकडे वळविण्यात त्यांची मोठी भूमिका होती. १९९७ पासून २००७ पर्यंत ते नगरसेवक होते. शिंदे गटात निष्ठावंतांपेक्षा हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्व दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असा आरोप करतानाच त्यांनी सिडकोवासियांची अनेक कामे होत नसल्याचे दुखणे मांडले आहे. आतापर्यंत शिंदे गटात उघडपणे नाराजी व्यक्त होत नव्हती. गोडसे, ठाकरे यांच्यामुळे ती होण्यास सुरुवात झाली आहे.
लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने नाराज आहे. निष्ठावंत असूनही महत्व दिले जात नाही. विचारले जात नाही. –मामा ठाकरे ( माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गट)