जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत दोन सहाय्यक फौजदारांनाही एका खासगी पंटरसोबत दोन हजाराची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वी केली.

तक्रारदाराच्या विरोधात खामगाव येथील न्यायालयात कलम १३८ प्रमाणे धनादेश न वटल्याचे प्रकरण दाखल असून, न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले होते. सदर वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी तसेच अटक वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ मिळवून देण्याच्या मोबदल्यात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील (५५) आणि आत्माराम सुदाम भालेराव (५७) यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. परंतु, लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदर तक्रारी प्रमाणे लाच मागणीची पडताळणी केली असता, सहाय्यक फौजदार पाटील आणि भालेराव यांनी पंचासमक्ष दोन हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे शुक्रवारी सापळा कारवाई केली असता, बाळकृष्ण पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती ठाणसिंग जेठवे (४२) याने लाचेची रक्कम स्वीकारली. तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, बाळू मराठे आणि भूषण पाटील, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली. दोनच दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेतील लिपिकासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

याशिवाय, गेल्या काही दिवसात पाचोरा येथे २९ हजार रूपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला, बांबू लागवडीची चार प्रकरणे मंजूर करण्याकरिता ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी तसेच कार्यालयातील लिपीक आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला, वडिलोपार्जित शेतजमि‍नीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठीला, कागदपत्रांच्या नक्कल देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन महसूल सहाय्यकांना आणि पाच हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महिलेस पकडण्यात आले आहे. या सर्व लाचखोरीच्या प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेली लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. त्या विषयी नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.