जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगरात राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर गुरूवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एक लाखाहून अधिक रक्कम लुटली. रक्षा ऑटो फ्युएल्स नावाचा हा पंप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा आहे.
प्रकाश माळी आणि दीपक खोसे, अशी मारहाण झालेल्या पंपावरील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर गुरूवारी साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवर पाच जण आले होते. त्यांनी आजुबाजुला कोणी नाही हे लक्षात घेऊन पंपावरील माळी आणि खोसे या दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्याला गावठी बंदूक लावून जवळपास एक लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडून हिसकावून घेतली. तसेच पंपाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे कर्मचाऱ्यांसह पेट्रोल पंपावर पोहोचले. मात्र, तोपर्यंत सर्व दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले होते. न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला जात असून, पोलिसांचे दुसरे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दहिवद येथे पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्यानंतर मुक्ताईनगर शहराजवळील महामार्गावर गुरुवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडा पडला. दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात मे महिन्यातही चोपडा तालुक्यातील हातेड येथे एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, चोपडा ग्रामीण पोलिसांना त्यावेळी दरोडेखोरांचा प्रयत्न हाणून पाडला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.