लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: भुसावळ – पुणे – नाशिक हुतात्मा एक्सप्रेस नऊ महिन्यांपासून बंद आहे. भुसावळ विभागात तिसर्या मार्गाची तसेच इतर तांत्रिक कामे सुरू असल्याने ३१ ऑक्टोंबरपर्यंत ही गाडी रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पण त्यामुळे मनमाड – नाशिक – पनवेलमार्गे पुणे रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही रेल्वे पुन्हा लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातून नाशिक -पुणे -पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शैक्षणिक, व्यावसायिक कारणासाठी मनमाडसह परिसरातून प्रवास करणारे अनेक जण आहेत. अनेक महिन्यांपासून भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस बंद आहे. पुणे -पनवेल -इगतपुरी -कसारा घाट, नाशिक- मनमाड- भुसावळ दरम्यान ही एक्सप्रेस सुरू होती. या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देखील तिने उत्तर भारतातून थेट पनवेलपर्यंत जाण्याची सुविधा असल्याने या रेल्वेचा फायदा व्हायचा. मात्र रेल्वे प्रशासनाने जानेवारीपासून ही रेल्वे बंद केली आहे.

हेही वाचा… नाशिक मनपा कर्मचारी चौदा दिवसानंतर संपावर; सत्ताधाऱ्यांसह शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी ठाकरे गटाची चाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रवाशांना नाईलाजाने एसटी अथवा खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. दरम्यान कर्जत स्थानकाच्या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही रेल्वे तीन महिने बंद राहील, असे कारण सुरुवातीला देण्यात आले होते. त्यानंतर कर्जत विभागात काम सुरू केल्यामुळे ही रेल्वे ३१ मार्चपासून पुन्हा अनिश्चित काळासाठी बंद केली. सध्या इगतपुरी ते भुसावळ दरम्यान मेमू चालवली जाते. परंतु या गाडीचा पुणे येथे जा-ये करणाऱ्यांना काही फायदा होत नाही. त्यामुळे मनमाड -नाशिक -पनवेलमार्गे पुणे दरम्यानची ही रेल्वे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. भुसावळ विभागात विविध तांत्रिक कामे सुरू आहेत. तिसर्या मार्गाचे काम सुरू आहे. सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी रद्द ठेवण्यात आली आहे. पुढील नियोजन अद्याप ठरलेले नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.