नाशिक – लहान मुले, विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण, गरोदर माता आदींनी कोणती आसने केली पाहिजेत, याविषयी स्वतंत्रपणे योगा मार्गदर्शनपर चित्रफिती केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून तयार करण्यात येणार आहेत. समाजमाध्यमात त्या प्रसारित करून सर्वांना सहजपणे आपल्या सोयीची योगासने करता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे दिली.
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे शुक्रवारी सकाळी येथील गौरी पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी जाधव यांनी संवाद साधला. खेळातही योगाचा समावेश होऊन एशियाड, ऑलिम्पिकमध्ये तो आला. नवीन अभ्यासक्रमात समावेश होत आहे. यामुळे केवळ महाविद्यालयात नव्हे, तर शाळेतही लहान मुलांपासून योगाची आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष केंद्रांत सोयी सुविधांचा अभाव असल्याविषयी त्यांनी केंद्र सरकार आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत असल्याचे नमूद करुन सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याकडे लक्ष वेधले. आयुष केंद्रातील कर्मचाऱ्ऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत राज्यांकडून आढावा घेऊन सूचना केली जाईल. योग विद्यापीठाला जागा उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाल्यानुसार यावर्षी देशातील २०० जिल्हा रुग्णालयांत कर्करोग देखभाल केंद्रांची उभारणी केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
राज्यात आयुष मंत्रालय तीन विभागात विभागलेले आहे. आरोग्याशी संबंधित विषय आरोग्य खात्याकडे, शिक्षणाशी संबंधित वैद्यकीय शिक्षण तर औषधांशी संबंधित विषय अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. केंद्रात आयुष एकत्रित झाले, त्याच धर्तीवर राज्यात एकत्रित झाल्यास चांगले काम, प्रचार व प्रसार होऊ शकेल, असे आयुषमंत्री जाधव यांनी नमूद केले.