जळगाव : प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. दुसरीकडे माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे थेट आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनीही बच्चू कडूंना दिले होते. प्रत्यक्षात, मंत्री पाटील यांच्या पाळधीत पोहोचल्यावरही बच्चू कडू त्यांच्या घरी गेले नाहीत.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून राज्य सरकारचा निषेध केला गेला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दोघांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली.

त्यावेळी बच्चू कडू यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांचा आता खालुनही आवाज निघत नाही, असा टोला त्यांनी विशेषतः मंत्री पाटील यांना हाणला होता. आक्रोश मोर्चानंतर आता दुसरा मोर्चा थेट पालकमंत्र्यांच्या घरावर काढायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असेही आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनीही मोर्चे वगैरे काढणे तुमचा धंदा नाही, तो आमचा धंदा आहे. आम्ही शिंगाडे मोर्चा काढायचो तेव्हा असे १०-२० लोक येत नसत. माझ्या घरावर मोर्चा काढण्याच्या गोष्टी करतात. तूच येना रे काका… पाळधी गावात येऊन तर दाखव, अशा एकेरी भाषेत त्यांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केले होते. अर्थात, आपण बच्चू कडूंचे गावात आल्यावर स्वागत करू आणि त्यांना ठेचा-भाकरीचा पाहुणचार देऊ, अशी नरमाईची भूमिका पाटील यांनी नंतर लगेच घेतली होती.

शेतकरी आक्रोश मोर्चानंतर चाळीसगाव आणि कासोदा येथे रविवारी आयोजित मेळाव्यांना संबोधित करण्यासाठी बच्चू कडू पुन्हा जिल्हा दौऱ्यावर आले. जळगावहून कार्यक्रम स्थळाकडे जात असताना वाटेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पाळधी गाव लागले. त्याठिकाणी क्षणभर थांबलेले बच्चू कडू हे पाटील यांच्या घरी जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. परंतु, जाण्याची घाई असल्याने त्यांनी वेगळी वाट करणे टाळले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतरच पाटील यांच्या घरी ठेचा-भाकरी घेऊन जाईल, असे ते म्हणाले. तिकडे मंत्री पाटील हे सुद्धा बच्चू कडू यांची वाट पाहत सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच थांबले होते. त्यांच्या पाहुणचाराची तयारी म्हणून त्यांनी वांग्याचे भरीत, ठेचा आणि कळण्याची भाकरी, असा मेनू तयार करून ठेवला होता. बच्चू कडू माझे जुने मित्र आहेत. आम्ही दोघेही आंदोलकाची भूमिका निभावणारे लोक आहोत. ते घरी आले असते तर आनंद झाला असता, असे मंत्री पाटील म्हणाले.