जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानंतर प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे थेट आव्हान आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही बच्चू कडू यांना दिले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दोघांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली.
बच्चू कडू यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक फक्त पक्षासाठी आहेत, ते जनतेसाठी नाहीत. हे सगळे गुलाम आहेत. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांचा आता आवाज निघत नाही, असा टोलाही त्यांनी मंत्री महाजन आणि पाटील यांना हाणला. आक्रोश मोर्चानंतरही बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील चारही मंत्र्यांवर शेतीप्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टिकास्त्र सोडले. शेतकरी त्यांचे गाऱ्हाणे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडू शकणार नाही, अशी व्यवस्था आधीच करण्यात आली होती. मात्र, ती व्यवस्था शेतकऱ्यांनी एकजुटीने हाणून पाडली. आता दुसरा मोर्चा थेट पालकमंत्र्यांच्या घरावर काढायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असेही आवाहन बच्चू कडू यांनी केले.
दरम्यान, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. माजी खासदार उन्मेश पाटील पाच वर्षे खासदार असताना कुठे गेले होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाही का, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काही लोक फक्त चमको आहेत. त्यांना माहिती होते की, २८ तारखेला जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केळी पीक विम्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी तीच तारीख मोर्चासाठी निवडली. मोर्चे वगैरे काढणे तुमचा धंदा नाही, तो आमचा धंदा आहे. आम्ही शिंगाडे मोर्चा काढायचो तेव्हा असे १०-२० लोक येत नसत. माझ्या घरावर मोर्चा काढण्याच्या गोष्टी करतात. तूच येना रे काका… पाळधी गावात येऊन तर दाखव, अशा एकेरी भाषेत त्यांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केले.