जळगाव – जळगाव ते मनमाड मार्गावरील कजगाव स्थानकावर बडनेरा– नाशिक मेमू गाडीला तीन महिन्यांपूर्वीच थांबा मंजूर झाला होता. परंतु, भुसावळ विभागाकडून त्याबाबतच्या कार्यवाहीला विलंब केला जात होता. ‘लोकसत्ता’ने त्यावर प्रकाशझोत टाकून लक्ष वेधल्यानंतर अखेर गाडीला बुधवारपासून कजगाव येथे नियमित थांबा मिळाला आहे.

कजगाव रेल्वे स्थानकावर भुसावळ ते देवळाली तसेच भुसावळ ते इगतपुरी मेमू व्यतिरिक्त अमरावती ते पुणे एक्स्प्रेस, या गाड्या दिवसभरात थांबतात. तिन्ही गाड्यांपैकी जळगावहून कजगाव जाण्यासाठी सकाळी साडेसातची इगतपुरी आणि सायंकाळी सहाची देवळाली धावणारी मेमू गाडी तेवढी सोयीची आहे.

अमरावती- पुणे एक्स्प्रेस पहाटे पावणेचारला कजगावहून जाते. त्या गाडीचा कोणताही उपयोग प्रवाशांना होत नाही. त्यामुळे जळगावहून दुपारी ०३.३७ सुटणाऱ्या  बडनेरा ते नाशिक मेमूला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर  कजगावला बडनेरा ते नाशिक मेमूला थांबा मंजूर केल्याचे पत्र जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना प्राप्त झाले होते. मात्र, तीन महिने उलटले तरी त्या मेमूला कजगाव येथे अधिकृत थांबा मिळू शकला नव्हता. त्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अखेर बुधवारपासून कजगाव स्थानकावर बडनेरा ते नाशिक दरम्यान धावणाऱ्या मेमूला अधिकृत थांबा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणामी, जळगावहून दुपारी पावणेचारच्या सुमारास कजगाव जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली असून, कामानिमित्त जळगावात ये-जा करणाऱ्या परिसरातील प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकणार आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यातील नागरिकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या गाडीला कजगाव स्थानकावर खासदार स्मिता वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.