जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या प्राधिकरणांच्या रविवारी होणार्‍या निवडणुकीसाठी २५ केंद्रांत मतदान होणार असून, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. १० जानेवारी रोजी विद्यापीठात मतमोजणी होईल.

व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन अध्यापक, प्राचार्य आणि विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधून अधिसभेसाठी जागा निवडून दिल्या जाणार आहेत. याशिवाय विद्यापरिषद आणि १३ अभ्यास मंडळांसाठीही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात १३, धुळे जिल्ह्यात आठ, नंदुरबार जिल्ह्यात चार, अशा एकूण २५ केंद्रांत मतदान होणार आहे.

हेही वाचा – आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक : प्राथमिक मतदार याद्यांवरील हरकतींवर कुलगुरूंसमोर सुनावणी

व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून खुल्या संवर्गातील चार जागांसाठी सहा उमेदवार, महाविद्यालयांच्या अध्यापकांमधून पाच खुल्या संवर्गासाठी १४ उमेदवार आहेत. प्राचार्यांमधून पाच खुल्या संवर्गासाठी सात उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तर विद्यापीठ अध्यापकांच्या गटामधून खुल्या संवर्गातील एका जागेसाठी तीन उमेदवार, अनुसूचित जमाती संवर्गासाठी एक जागेसाठी दोन उमेदवार आणि महिलांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी दोन महिला उमेदवार उभ्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापरिषदेच्या वाणिज्य व व्यवस्थापनाच्या विद्याशाखेतील खुल्या संवर्गासाठीच्या एका जागेसाठी तीन उमेदवार आहेत, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या खुल्या संवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. मानव्य विद्याशाखेच्या खुल्या संवर्गासाठीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. १३ अभ्यासमंडळांसाठीही निवडणूक होणार आहे.