जळगाव : ईव्हीएम यंत्र हटविण्यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारत मुक्ती, राष्ट्रीय ओबीसी, राष्ट्रीय परिवर्तन आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात गुरूवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. प्रसंगी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जिल्हा संयोजक वसंत कोलते, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, बहुजन क्रा़ती मोर्चाचे जिल्हा संयोजक पंकज तायडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
जीएस मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जेलभरो आंदोलनाची फेरी नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकापर्यंत गेली. त्या ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांना अडविले. त्यांनतर स्त्री-पुरुष आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली. पोलिसांचा मोठा ताफा असताना, आंदोलकांना अटक करण्यासाठी गाड्या कमी पडल्या.
देशातील सर्व निवडणुका या ईव्हीएम यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, ओबीसी आणि इतर सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करावी, बोधगया येथील महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे, आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाला पायबंद घालण्यात यावा, मुस्लिम समुदायाच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण करावे, एस.सी., एस.टी., ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे, महिलांचा सन्मान व सुरक्षा वाढवावी, राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करावी, महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबवाव्यात. या समुहातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, धर्मांतरीत आदिवासी आणि ख्रिश्चन व मुस्लिमांशी होत असलेले भेदभाव थांबवावे, कंत्राटी भरती पद्धत रद्दी करावी, जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी, खाजगी क्षेत्रातील श्रमिक, मजुर व कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावी, खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पालकांची सुरु असलेली आर्थिक लुट थांबविण्यात यावी, महापुरुषांच्या पुतळ्यांचे व मेहरुण तलावाचे सुशोभीकरण करावे, जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या काही मागण्या आंदोलकांनी शासनाकडे केल्या.
सुमित्र अहिरे, राजु खरे, डॉ.शाकीर शेख, प्रमोद सौंदाणे पाटील, सुनिल देहडे, जाकीर कुरेशी, खुमानसिंग बारेला, धनराज बंजारा, गोपाळ कोळी, भरत पाटील, योगेश सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे, जगदीश सपकाळे, गनी शाह, रविंद्र बाविस्कर, विजय सुरवाडे, बापु सोनवणे, मुकुंद सपकाळे, अय्याज अली, बळवंत भालेराव, विजय निकम, विनोद निकम, फारुख शेख, सुनील सुरवाडे, भोजराज सोनवणे, अमजद रंगरेज, चंद्रशेखर अहिरराव, पी.डी.सोनवणे, दिलीप तासखेडकर आदींनी जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला.