नाशिक – शुक्रवारी सकाळी नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. राजधानी, सचखंड, दुरांतो, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानक यार्डाजवळ ही घटना घडली. मालगाडी दौंडकडे निघाली होती. तिचा रिकामा डबा रुळावरून घसरल्याने भुसावळ-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. याचा फटका लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांना बसला. सकाळी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मुंबईकडे मार्गस्थ होतात. या घटनेमुळे २२२२२ दिल्ली- मुंबई राजधानी एक्स्प्रेस, १२७१८ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस, ११०१२ धुळे – मुंबई एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, १२१४२ पाटणा-एलटीटी पाटलीपुत्र एक्स्प्रेस आदी गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या. काही गाड्या दीड ते दोन तास खोंळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले.
भुसावळ-मुंबई मार्गावर सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण देशातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे मार्गस्थ होतात. या घटेमुळे रेल्वेगाड्या तीन तास उशिराने धावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नांदगाव स्थानकात दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच रेल्वे मार्ग सुरळीत होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुरुस्तीला विलंब झाल्यास खोळंबलेल्या रेल्वेगाड्या विरुद्ध मार्गाने म्हणजे मुंबईहून-भुसावळकडे येणाऱ्या मार्गावरून पुढे नेण्याचा विचार केला जात आहे. परंतु, या पर्यायाचा अवलंब केला गेला की नाही, याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी म्हणजे जूनमध्ये भुसावळ-मुंबई मार्गावरील देवळाली-लहवीत स्थानकादरम्यान ओव्हडहेड वायर तुटल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक अशीच विस्कळीत झाली होती. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हा चाकरमान्यांची भिस्त असणारी पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेसलाही दोन ते तीन तास विलंब झाला होता. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर सुमारे पाच तासांनी नाशिक-मुंबई दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती. शुक्रवारी मालगाडीचा डबा घसरण्याची घटना सकाळी सव्वासात वाजता घडली. तत्पुर्वीच, राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्या होत्या. त्यामुळे या गाड्यांचा खोळंबा झाला नाही.