जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीकडून मेळाव्यांसह सभा आयोजित केल्या जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहे. अशा वेळी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा लक्ष्य करून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यातील दोन बलाढ्य नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. हनी ट्रॅप प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे दोघांच्या वैराला नवा रंग मिळाला. खडसेंनी महाजनांवर थेट आणि अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ले चढवले. महाजन यांनीही प्रत्युत्तर देताना मागे हटण्याची भूमिका घेतलेली नाही.
तशात पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरण बाहेर आले आणि खडसेंवर टीका करण्याचा नवा मुद्दा महाजनांना सापडला. त्यावरूनही दोघांमध्ये बरेच दिवस रणकंदन माजले. हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून मंत्री महाजन आणि आमदार खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असताना, दोन्ही नेत्यांचे समर्थक कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. प्रतिमांना शाई फासण्यासह जोडे मारण्याचे प्रकार सुरू झाल्याने जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापून निघाले.
खडसे आणि महाजन यांच्यात एकेकाळी गुरू-शिष्याचे नाते होते. दोघांनी उत्तर महाराष्ट्राला विकासाचे स्वप्न दाखविण्याचे काम केले होते. मात्र, भाजपमध्ये काम करत असतानाच दोघांमधील संबंध अचानक ताणले गेले. खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघांमधील कलगीतुरा कायम राहिला. दोघांमधील राजकीय वाद कमी होण्याऐवजी आणखी विकोपाला गेला. हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर दोघांमधील शाब्दिक युद्धाने तर विखारी वळण घेतले.
एकमेकांवर आरोप करताना कुटुंबियांना मध्ये आणण्यासही ते मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून आले. तशात काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडल्यानंतर आमदार खडसे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला. त्याविषयी बोलताना थेट खडसेंच्या संपत्तीवर मंत्री महाजन यांनी भाष्य केल्याने पुन्हा एकदा दोघांमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसून आली.
दरम्यान, मंत्री महाजन यांनी मागील काही निवडणुकांमधील जुने किस्से सांगून एकनाथ खडसेंना डिवचण्याचा प्रयत्न आता पुन्हा केला आहे. मी म्हणजे पक्ष म्हणणाऱ्या नाथाभाऊंचा आपण कसा पद्धतशीरपणे कार्यक्रम केला, याच्या सुरस कथाही ते अलीकडे सांगताना दिसत आहेत. मुक्ताईनगरात खडसे खाट पाडून बसले होते.
मात्र, मी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गेलो. रात्रभर तिथे थांबून त्यांची खाटच मोडून टाकली. त्याआधी त्यांनी सभा घेऊन माझ्यावर भरपूर तोंडसुख घेतले, नको ते आरोप केले. मात्र, मी शेवटच्या दिवशी त्यांचा बरोबर कार्यक्रम केला. कोट्यवधी रूपये खर्च करूनही त्यांच्या मुलीचा विधानसभेच्या निवडणुकीत लागोपाठ दोन वेळा पराभव झाला.
मी-मी म्हणणाऱ्यांचे काय हाल झाले. मी म्हणजे भाजप, मी म्हणजे पक्ष, हा भाऊ हा नाथाभाऊ. आता कशाचे काय राहिले नाही. पक्ष होता म्हणून तुम्ही मोठे होता. आता तुमची किंमत झिरो झाली आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे. दूध संघात त्यांच्या सौभाग्यवतींचा पराभव झाला, जिल्हा बँक राहिली नाही, नगरपालिका राहिली नाही. कुठेच काही राहिले नाही. त्यामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी खडसेंना दिला आहे.
