जळगाव – अमळनेरमध्ये शेतीप्रश्नी प्रशासनाला धारेवर धरताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींबद्दल नुकतीच अर्वाच्च भाषा वापरली. त्यावरून महायुतीने त्यांना लक्ष्य केले असताना, चाळीसगावमधील भाजप आमदाराने चार वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याला दिलेल्या वाईट वागणुकीचा व्हिडीओ आता माजी खासदार पाटील समर्थकांनी व्हायरल केला आहे.
जळगावमध्ये गेल्या महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शेतीप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच धर्तीवर बुधवारी अमळनेरमध्ये माजी खासदार पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या दरम्यान, अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफी करून सात बारा उतारे कोरे करावेत आणि खरीप पिकांना पीक विमा मंजूर करावा, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रसंगी तहसीलदारांसह प्रांताधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी, मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना संबोधित करताना माजी खासदार पाटील यांनी जळगावच्या विद्यमान खासदार स्मिता वाघ यांच्यावर टीका केली. तसेच त्यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचून दाखवत त्या अपघाताने खासदार झाल्याचे वक्तव्य करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय, प्रशासनाला जाब विचारताना तुम्हाला काहीच न बोलणाऱ्या ताई आणि दादा यांनाही द्यायला पाहिजे, असे वक्तव्य माजी खासदार पाटील यांनी जाहीरपणे केले. त्यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र निषेध गुरूवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी केला. पाटील यांच्या प्रतिमेला काळे फासून होळीही करण्यात आली.
दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून महावितरणच्या तत्कालीन अधिकाऱ्याला खुर्चीला बांधून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. तो व्हिडीओ आता समाज माध्यमावर टाकून तेव्हा तुम्ही चांगले आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो तर संस्कृती दिसते का, असा प्रश्न माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.
आमदार चव्हाण यांचा तो व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आल्यानंतर अद्याप आमदार किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणी मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. एक मात्र नक्की आहे की, एकेकाळी जीवाला जीव देणाऱ्या दोन्ही मित्रांमध्ये या निमित्ताने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याचे चिन्हे दिसून आली आहेत.