नाशिक: शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे वर्चस्व असून विविध कार्यक्रमांत संबंधितांना मान-सन्मान देताना डावलले गेल्याची भावना भाजपमध्ये बळावली आहे. संमेलनास निधी देणारे भाजपचे आमदार तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना संमेलनास निमंत्रित केले गेले नसल्याने महापौरांनी आयोजकांना खडसावले. त्यामुळे संमेलनाच्या तोंडावर राजकीय वादाने डोके वर काढले आहे.

साहित्य महामंडळाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत संमेलनात राजकीय मंडळींची मांदियाळी कायम राहणार आहे. त्यातही आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी भाजप असे गट पडले आहेत. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ असल्याने संमेलनावर राष्ट्रवादीचा प्रभाव राहणार असल्याचे मानले जात होते. परंतु, स्वागत मंडळाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) आणि महापौर सतीश कुलकर्णी (भाजप) यांना स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि, संमेलनाच्या तीन दिवसीय कार्यक्रमांतील निमंत्रितांवरून वादाची ठिणगी पडली. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा कुठेही विचार झाला नसल्याने स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

संमेलनाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन पध्दतीने उपस्थित राहणार आहेत. कला प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आयोजकांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (शिवसेना) यांना निमंत्रित केले आहे. संमेलनाच्या समारोपास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (काँग्रेस) हजेरी लावणार आहेत. संमेलनातील भरगच्च कार्यक्रमात भाजपच्या कुणालाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. याबद्दलचा रोष लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमोर महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या भूमिपूजनास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना बोलाविण्यात आले होते. पण मंडपाचे भूमिपूजन आणि संमेलन यात फरक असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

संमेलनातील सहभागावर अनिश्चितता

भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या जिल्ह्यातीलच आहेत. संमेलनासाठी शहर आणि ग्रामीण भागातील भाजप आमदारांनी निधी दिला. असे असूनही आयोजकांना भाजपचे मंत्री, राज्यातील वरिष्ठ नेते, स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावेसे वाटले नाही. संयोजकांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आग्रहपूर्वक निमंत्रित केले. पण, भाजपला डावलले. यावरून महापौरांनी आयोजकांना खडसावले. लोकहितवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. संमेलनातील रागरंग पाहता संमेलनात सहभागी व्हायचे की नाही ते ठरविले जाईल. केवळ ग्रंथ दिंडीत सहभागी होईन, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.