नाशिक – पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपटटी केली. आणि महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या गोटात स्थानिक पातळीवर कमालीची अस्वस्थता पसरली. बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल असून त्यांची प्रतिमा मलीन आहे. त्यांना प्रवेश दिल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला एक पाऊल मागे यावे लागेल, असा इशारा देत भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशास विरोध केला.

दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात हेच सूर उमटत आहेत. अलीकडेच नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बडगुजर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर संघटनात्मक नेमणुकीवरून पक्षातील अस्वस्थता जाहीरपणे उघड केली. या घटनाक्रमानंतर त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. नाराजी व्यक्त करणे गुन्हा असेल तर तो आपण केला असून त्याची पक्षातून हकालपट्टी ही शिक्षा असेल तर ती मान्य असल्याची प्रतिक्रिया बडगुजर यांनी व्यक्त केली. या निर्णयाचे पडसाद महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत अधिक उमटले.

बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या संभाव्य प्रवेशाला कडाडून विरोध केला. दाखल गुन्ह्यांवरून कारवाई टाळण्यासाठी ते भाजपच्या आश्रयाला येण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यांनी अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांविरोधात विखारी प्रचार केला. अशा बडगुजरांना प्रवेश दिल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला एक पाऊल मागे यावे लागेल, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोध राहील असे स्पष्ट केले.