नाशिक – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांविषयी केलेली विधाने अत्यंत आक्षेपार्ह, फूट पाडणारी, बदनामीकारक असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून द्वेष निर्माण करणारी असल्याकडे लक्ष वेधत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मानहानीची नोटीस त्यांना पाठवली आहे. दुबे यांनी जाहीर लेखी माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि शिवसेनेने (उद्दव ठाकरे) आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर आगपाखड केली होती. त्यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचे दाखले मनसेचे शहराध्यक्ष कोंबडे यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यावतीने पाठविलेल्या नोटिसीत दिले. दुबे यांची विधाने अत्यंत आक्षेपार्ह, फूट पाडणारी व द्वेष निर्माण करणारी आहेत. दुबे यांच्या विधानांचा प्रादेशिक द्वेष निर्माण करण्याचा हेतू आहे. ज्यामुळे सार्वजनिक शांतता व सौहार्दाला धोका पोहोचू शकतो, याकडे लक्ष वेधण्यात आले.
दुबे यांनी नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत जाहीर अथवा लेखी माफी मागावी, समाज माध्यमांवरील सर्व बदनामीकारक विधाने तत्काळ मागे घ्यावीत, भाषिक, प्रादेशिक किंवा सांस्कृतिक ओळखींना लक्ष्य करणारी विधाने करणे थांबवावे, अन्यथा तुमच्याविरुद्ध दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करावी लागेल, असे सूचित करण्यात आले आहे.