मालेगाव : मालेगाव पाॅवर सप्लाय लिमिटेड या खासगी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारात दिवसागणिक वाढ होत असल्याने ग्राहकांना झळ सोसावी लागत असल्याची तक्रार करीत मंगळवारी भाजपतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत कारभारात सुधारणा न झाल्यास कंपनीला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आंदोलकांच्यावतीने देण्यात आला.
शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे वेगवेगळ्या भागासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परंतु, काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या वेळेलाच वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव नागरिकांना वारंवार येत आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा करणे शक्य होत नसल्याने पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. या संदर्भात महापालिका आणि वीज कंपनीचे अधिकारी परस्परांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.
शहरातील वीज वितरणाचा खासगी ठेका दिल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडित होत असल्याबद्दल पूर्वकल्पना देण्यासाठी ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवले जात होते. मात्र अलीकडे कंपनीने असे संदेश पाठवणे बंद केले आहे. या शिवाय विजेच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी जी टोल फ्री नंबरची सेवा आहे, त्याच्यातही मोठ्या त्रुटी आहेत. बऱ्याचदा हा टोल फ्री नंबर लागत नाही, जर लागला तर ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आक्षेप आंदोलकांनी नोंदविला. ग्राहकांना अवास्तव वीज देयके देणे, तक्रारींचे निरसन वेळेवर न करणे, कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक देणे, अशा तक्रारी आंदोलकांनी केल्या. भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूतात्या सोयगावकर, पोपट लोंढे, हरिप्रसाद गुप्ता आदी सामील झाले होते.
भाजप महानगरप्रमुखाला ठेंगा
आंदोलनादरम्यान भाजप महानगरप्रमुख देवा पाटील यांनी खासगी वीज कंपनीच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त केला. विजेच्या तक्रारी संदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम सिंग यांना आपण तब्बल २० वेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु एकदाही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. खुद्द भाजपच्या शहर कार्यालयातील वीज पुरवठा तब्बल चार दिवस बंद होता. पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्यावर मंगळवारी सकाळी तेथील वीजपुरवठा सुरू करण्यात आला, अशी माहिती देखील पाटील यांनी दिली.