नाशिक : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे सात दिवस उरल्याने दुचाकी फेरी, समाज माध्यम, प्रत्यक्ष घरोघरी जावून प्रचारावर भर देण्यात येत आहे. याचा परिणाम प्रचार साहित्य विक्रीवर होत आहे. यंदा प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचार साहित्य खरेदीस अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने प्रचार साहित्य विकणाऱ्यांची भिस्त अपक्ष उमेदवारांवर आहे. अजूनही हे चित्र बदलू शकेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे.

निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडाल्यावर प्रभावी प्रचार कोणत्या माध्यमातून करण्यात येईल, याकडे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागून असते. प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा, उमेदवारांच्या चौकसभा, पत्रक वाटप, फलकबाजी, समाज माध्यमातून संदेश पसरविणे, अशा पध्दतींचा प्रामुख्याने सध्या वापर करण्यात येत आहे. प्रचाराला रंग येतो तो प्रचार साहित्याने. यामध्ये झेंडे, गळ्यातील पट्टी, बिल्ले, टोपी, यांचा समावेश असतो. काही वर्षांपासून प्रचाराचे साहित्य राजकीय पक्षांकडून दिले जात असल्याने या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. याविषयी जयस्वाल झेंडेवाले दुकानाचे मनीष जयस्वाल यांनी माहिती दिली. यंदा प्रचार साहित्य विक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. राजकीय पक्षांकडून प्रचार साहित्य उमेदवाराला दिले जात आहे. निवडणूक आयोग खर्चावरही लक्ष ठेवून असल्याने साहित्य खरेदीला उमेदवाराकडून निर्बंध येतात. शहर परिसरात कुठेही राजकीय पक्षाचे झेंडे नाहीत. कारण, या झेंड्यांची विक्री वेगळ्या किंमतीने होते. निवडणूक आयोगाकडून या झेंड्यांची वेगळी किंमत लावली जाते.. झेंडे लावले की ते खर्चात धरले जातात, असे त्यांनी सांगितले. याशिवाय काही वर्षांपासून समाज माध्यमांचा वापर वाढला आहे.

हेही वाचा…गुजरातशी संलग्न बागलाण, इगतपुरी, कळवण, दिंडोरी खर्चविषयक संवेदनशील मतदारसंघ

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप, यासारख्या कोणत्याही समाज माध्यमात उमेदवाराची जाहिरात दिसते. याचा परिणाम निवडणूक साहित्य विक्रीच्या व्यवसायावर होत आहे. पक्षाकडून बिल्ले, झेंडे, पट्टी, मफलर, टोपी आदी साहित्य देण्यात येते. पण काही उमेदवारांकडून वैयक्तीकरित्या साहित्याची मागणी केली जाते. या मध्ये उमेदवाराचे छायाचित्र, पक्षचिन्ह यांचा समावेश असल्याचे जयस्वाल यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या जाहीर सभांमध्ये साहित्याला मागणी वाढू शकते. सद्यस्थितीत दिवसाला केवळ १५ ते २० हजार तर, कधी ३० ते ४० हजाराचा व्यवसाय होतो. प्रचाराच्या शेवटच्या तीन दिवसात हे चित्र बदलेल, अशी जयस्वाल यांना अपेक्षा आहे. सध्या अपक्ष उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रचार साहित्याची मागणी होत आहे.