नाशिक : ॲमेझॉन सहायता सेवेच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे इगतपुरीतील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता नाशिकमधील दोन बेकायदेशीर कॉल सेंटरवर कारवाई केली. त्या अंतर्गत नाशिकसह कल्याण येथेही छापे टाकण्यात आले. या कॉल सेंटरमधून अस्तित्वात नसलेल्या विमा पॉलिसीच्या नावाखाली ब्रिटनमधील (युके) नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर फसवणूक प्रकरणात सीबीआयने नाशिकमधील दोन बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत दोन जणांना अटक केली. संशयितांकडून स्वगन बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालविल्या जाणाऱ्या दोन बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चार जणांसह सरकारी सेवक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित स्वगन बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर चालवले होते.

संबंधितांकडून विमा एजंट, सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून ब्रिटनमधील नागरिकांची फसवणूक केली होती. या केंद्रांत सुमारे ६० कर्मचारी काम करीत होते. जे बनावट क्रमांक आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून पीडितांना क्रेडिट, डेबिट कार्ड तपशील शेअर करण्यास आणि अस्तित्वात नसलेल्या विमा पॉलिसींसाठी पैसे भरण्यास भाग पाडत होते. सीबीआयच्या पथकाने नाशिक, कल्याण (ठाणे) येथे छापे टाकले, यामध्ये पीडितांची माहिती, बनावट विमा पॉलिसी कागदपत्रे, आठ भ्रमणध्वनी, आठ संगणक प्रणाली, सर्व्हर आणि पाच लाख रुपयांची रोकड यासह गुन्हेगारी स्वरुपाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.

गुन्ह्यातून मिळणारे पैसे पेपल आणि बँकिंगच्या माध्यमातून पाठवले जात होते, ज्यांचे खाते संशयितांनी व्यवस्थापित केले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत सीबीआयने दोन संशयितांना अटक केली. त्यांना ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना कोठडी सुनावली.

यापूर्वी अमेरिका, कॅनडातील नागरिकांची फसवणूक

सीबीआयने गेल्या ऑगस्टमध्ये इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केले होते. ॲमेझॉन सहायता सेवेचे कॉल सेंटर असल्याचे भासवत संशयितांनी येथून परदेशात फसवे फोन केले. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणी मुंबईतील सहा जणांसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. सव्वा कोटींची बेहिशेबी रोकड, ५०० ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या सात अलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या.