नाशिक : ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी ओबीसी समाजाचे मोर्चे निघत असले तरी ओबीसी नेत्यांमध्येच आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ओबीसी समाजातील सर्वच प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येणे टाळू लागले आहेत. नागपूर येथील मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेते उपस्थित असताना ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती जाणवली. त्यानंतर बीड येथे भुजबळ यांच्या उपस्थितीतील मेळाव्यास वडेट्टीवार हे अनुपस्थित राहिले. बीड येथील मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर भुजबळ यांनी थेट टीका केली होती. त्यास वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर वडेट्टीवार यांना भुजबळ यांनी शनिवारी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

नागपूर येथे ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा निघाला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत एकट्या विजय वडेट्टीवार यांचे भाषण झाले होते. परंतु, या मोर्चात छगन भुजबळ उपस्थित नव्हते. त्यानंतर बीड येथे शुक्रवारी भुजबळ, धनंजय मुंडे,. विजय हाके यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. भुजबळ यांच्या टिकेला वडेट्टीवार यांनीही उत्तर दिले.

नागपूरमधील मोर्चांनंतर मला टार्गेट करण्यासाठी भाजपने छगन भुजबळ यांना माझ्या अंगावर सोडले, असा थेट आरोप ओबीसी नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. दोन समाजात भांडण लावून मूळ प्रश्नांवरून लक्ष हटविण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध नाही, पण सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आपला विरोध कायम आहे. जरांगे यांचा विषय थांबवून महायुती सरकारने काढलेल्या जीआरवर म्हणजेच सरकार पुराणावर चर्चा झाली पाहिजे. कारण ओबीसींचे खरे नुकसान त्याच जीआरमुळे होत आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या आरोपांना छगन भुजबळ यांनी शनिवारी येवला येथे उत्तर दिले. आम्ही कोणत्याही घटनेचे राजकारण करत नाही. बीड दरिंदेच्या माणसांनी जाळले. त्या घटनेनंतर आयोजित ओबीसी समाजाच्या बैठकीस वडेट्टीवार आले. त्यांनी पक्ष बाजूला ठेवू या आणि ओबीसी म्हणून एकत्र येऊ या, असे आक्रमक भाषण केले. त्यांच्या या भूमिकेविषयी मला आनंद वाटला. परंतु, त्यानंतर अचानक चक्र फिरले. कारण, त्यानंतर ओबीसी समाजाचे हिंगोली, पंढरपूर, इंदापूर, अहिल्यानगर येथे मेळावे झाले. या मेळाव्यांना वडेट्टीवार आलेच नाहीत. कारण, त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता.

समाज माध्यमात एक चित्रफित दोन दिवसांपासून फिरत आहे. त्यात विजय वडेट्टीवार जरांगे यांच्या शेजारी बसून मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगत आहेत. नंतर अंबडच्या ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसी आरक्षण संरक्षणाच्या गोष्टी त्यांनी केल्या. नंतर नागपूर येथे मोर्चा काढला. इथे एक बोल, कुठे मोर्चा काढ, असे का ? हे सर्व राजकीय दबावापोटी चालले आहे. आम्ही ओबीसी लढ्यात सातत्य ठेवले आहे. तुम्हीही सातत्य ठेवा. तुम्ही का दबावाखाली येतात ? आम्हांला त्यामागे राजकारण दिसत आहे, असा आरोप भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला.