शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या दाव्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी भाजपाचे नेते गिरीश महाजनदेखील उपस्थित होते.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“माझी या विषयावर सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, असा कोणताही विषय नाही. माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. या विषयावर ते लवकरच माध्यमांशी संवाद साधतील”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडून असं विधान येणं योग्य आहे का? असं विचारलं असता, “ते किती जबाबदार आहेत”, हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – प्रचार सभांमध्ये दिसत नसल्याविषयीच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर का हसले…

दरम्यान, “पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही परत घेणार नाही”, असे विधान अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्यालाही छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं. “अनिल देशमुख यांनी आता त्यांचा पक्ष सांभाळायला हवा. त्यांच्याकडील अनेक लोकं आमच्याकडे येण्यासाठी उत्सूक आहेत. त्यामुळे आमच्याकडून तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही”, असे ते म्हणाले.

गिरीष महाजन यांनीही दिली प्रतिक्रिया.

या प्रकरणी गिरीष महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली. “सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गेले दोन दिवस नाशिकमध्ये आहेत. ते सर्व आमदारांना भेटत असून निवडणुकीसंदर्भात बैठका घेत आहेत. त्यामुळे मध्यस्थीच विषय आला कुठून? अनिल देशमुखांना म्हणावं, त्यांनी आधी शरद पवार यांच्याबरोबर राहावं. तटकरेंची चिंता त्यांनी करू नये”, असं गिरीश महाजन म्हणाले.

हेही वाचा – राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला होता. “शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असं ते म्हणाले होते. तसेच माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असंही त्यांनी सागंगितलं होतं. याबरोबरच कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही”, असंही अनिल देशमुख यांनी म्हटले होतं.