जळगाव : एकेकाळी शहरात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतरही बऱ्याच कार्यक्रमांसाठी उपयोगी पडू शकेल, अशा अद्ययावत सभागृहाची कमतरता होती. जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून विशेष बाब म्हणून सुमारे ३० कोटी रूपये मंजूर करून आणले. ज्यामुळे जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह आकारास येऊ शकले. त्या ठिकाणी रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंत्र्यांसह खासदार, आमदार आणि शेकडो नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ आली.
जळगाव शहरात प्रशस्त नाट्यगृह अस्तित्वात नसताना जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहाचा अनेक वर्षे नाट्यगृह म्हणून वापर केला गेला. कालांतराने देखभाल व दुरूस्ती अभावी त्या सभागृहाची दुरावस्था झाली. शहरात पूर्वीपासून बालगंधर्व खुले नाट्यगृह असले तरी ते अनेक वर्षापासून दुर्लक्षितच होते. अशा स्थितीत जळगावात एखादे प्रशस्त आणि अद्ययावत नाट्यगृह असावे, अशी संकल्पना नाट्य चळवळीतील काही लोकांनी तत्कालिन पालकमंत्री देवकर यांच्याकडे मांडली. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु, तेव्हाचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शासन फक्त पाच कोटी रूपये देईल; उर्वरित निधी महापालिकेला खर्च करण्यास सांगा, असे सूचविले. आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने महापालिकेकडून तशी कोणतीच अपेक्षा करणे शक्य नसल्याचे देवकर यांनी अजितदादांच्या लक्षात आणून दिले.
अखेर, सुमारे ३० कोटी रूपयांचा निधी शासनाने मंजूर करून दिला. आणि खान्देशातील पहिले संपूर्ण वातानुकुलित छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव शहरात उभे राहिले. तत्कालिन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी स्वतः लक्ष घातल्याने त्यावेळी नाट्यगृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले. स्थानिक नाट्यकर्मींच्या कलाकृती तिथे सादर होऊ लागल्या. मुंबई, पुण्यात गाजणारी नाटके जळगावमध्ये पाहण्याची संधी शहरातील नाट्य रसिकांना मिळाली. परंतु, नाट्यगृह उभे राहिल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कोणी सांभाळावे याची निश्चिती न झाल्याने पुढे मोठा पेच निर्माण झाला. शेवटी एका खासगी संस्थेला नाट्यगृहाचे व्यवस्थापन सोपविण्यात आले.
रविवारी राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नागरी सत्काराचे आयोजन त्या नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे एक हजार नागरिक, जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त हे सर्व आवर्जून उपस्थित होते. सभागृह खच्चून भरलेले असताना आतमध्ये मोठा आवाज करणाऱ्या तात्पुरत्या काही पंख्यांशिवाय हवा येण्याची कोणतीच सोय नव्हती.
सभागृह वातनुकुलित असले तरी त्यात आधीच बिघाड झालेला होता. बाहेर पाऊस आणि आतमध्ये उकाडा होत असल्याने व्यासपीठावरील मान्यवरांसह समोर बसलेल्यांना दोन तास अक्षरशः घाम पुसत बसावे लागले. आयोजकांसह खुद्द ॲड. निकम तसेच मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी त्याविषयी नंतर दिलगिरी व्यक्त केली. या प्रकारामुळे नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नाट्यगृहाचे व्यवस्थापन शासनाने किंवा महापालिकेने आपल्याकडे घ्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.