धुळे – गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खुद्द गणराय खड्ड्याजवळ उभा राहून पाण्याच्या खोलीचा अंदाज घेत असल्याचे दृश्य उभे करुन महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने अनोखे आंदोलन केल्यानंतर अवघ्या काही तासात महापालिका प्रशासनाची वाट न पाहता समाजसेवक चेतन मंडोरे यांनी मुरूम भरलेले वाहन मागवून लगोलग खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली.
श्री गणपती मूर्ती विसर्जनाचा दिवस येऊन ठेपल्यावरही विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी कायम असल्याने प्रशासनाचा हा नाकर्तेपणा दाखविण्यासाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या आंदोलकांनी रस्त्यावर साचलेल्या डबक्यात बैठक मारत आंदोलन केले. शहरात या आंदोलनाची चर्चा सुरु झाल्यावर विसर्जन मिरवणूक मार्ग असलेल्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते तथा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी चेतन मंडोरे हे आले. त्यांनी दूरध्वनीवर कुणाशीतरी संपर्क साधला आणि खड्डे बुजविण्यासाठी मुरूम भरलेली गाडी मागवली. वास्तविक दरवेळी केवळ मुरूम टाकून का असेना रस्त्यावरचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात तरी बुजविण्यात येतात. यावेळी तसे काही झाले नाही, अशी नाराजी
महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा निमंत्रक कैलास हजारे यांनी व्यक्त केली. शहरातील बहुतेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गणपती विसर्जन मिरवणूक आणि आरास उभारण्यात आलेल्या वाहनांना कसरत करत मार्गस्थ व्हावे लागणार आहे. गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना यासाठी प्रचंड त्रास घ्यावा लागणार असूनही संभाव्य अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरी हक्क संघर्ष समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
गणपती विसर्जन मिरवणूक निघण्याआधी विसर्जन मार्गवरचे खड्डे बुजवावेत, अशी मागणी काही दिवसांपासून करण्यात येत आहे. तरीही महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कुठलीही ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढे आलेली नाही. यामुळे अखेर महानगर नागरी हक्क संघर्ष समिती रस्त्यावर उतरली.
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अन्य वेगवेगळ्या भागातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.अनेक भागात काँक्रीट रस्ते असले तरी बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम राहिली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाल्याने असे रस्ते चर्चेचा आणि टिकेचा विषय ठरले आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक ज्या रस्त्याने जाणार आहे, त्या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. यामुळे विविध मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील गणेशभक्त प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
गणपती उत्सवाचा आता समारोप होण्याची आणि गणपती विसर्जन करण्याची वेळ आली असतांनाही खड्डे बुजविण्याची व्यवस्था न झाल्याने किमान विसर्जनाच्या एक दिवस आधीतरी खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा समितीतर्फे व्यक्त करण्यात आली. तेही न झाल्याने महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्यावतीने आज रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून करण्यात आलेले आगळेवेगळे आंदोलन लक्ष्यवेधी ठरले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा निमंत्रक कैलास हजारे, रमेश पोद्दार, संजय बगदे,मिलिंद सोनवणे, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, पप्पू सहानी, मनोज राघवन,मुकेश गुप्ता, राजेंद्र गुजर, अमित सोनवणे यांच्यासह अन्य आदी समिती सदस्य उपस्थित होते. या आंदोलनामुळे चेतन मंडोरे यांनी स्वत: खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला.