जळगाव : रेल्वे मंत्रालयाने खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यानंतर जळगाव ते मनमाड मार्गावरील कजगाव स्थानकावर बडनेरा- नाशिक मेमू गाडीला तीन महिन्यांपूर्वीच थांबा मंजूर केला आहे. परंतु, भुसावळ विभागाकडून त्याबाबतची कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही. कजगावला मेमू गाडी न थांबल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कजगाव रेल्वे स्थानकावर भुसावळ ते देवळाली तसेच भुसावळ ते इगतपुरी मेमू व्यतिरिक्त अमरावती- पुणे एक्स्प्रेस या गाड्या दिवसभरात थांबतात. तिन्ही गाड्यांपैकी जळगावहून कजगाव जाण्यासाठी सकाळी साडेसातला इगतपुरी आणि सायंकाळी सहाला देवळाली धावणारी मेमू गाडी सोयीची आहे. अमरावती- पुणे एक्स्प्रेस पहाटे पावणेचारला कजगावहून जाते. त्या गाडीचा काहीएक उपयोग प्रवाशांना होत नाही. त्यामुळे जळगावहून दुपारी साडेतीनच्या दरम्यान सुटणाऱ्या बडनेरा- नाशिक मेमूला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे.
खासदार स्मिता वाघ यांनीही त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर कजगाव येथे थांबा मंजूर झाल्याचे पत्रही प्राप्त झाले. त्यास तीन महिले झाले असले तरी प्रत्यक्षात बडनेरा- नाशिक मेमू कजगावला अजूनही थांबत नाही. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातीलच वरणगाव आणि बोदवड स्थानकांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीनुसार ही मेमू थांबण्यास कधीच सुरूवात झाली आहे. कजगावला तीन महिन्यांपासून थांबा मंजूर असूनही मेमू थांबत नसल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नाशिक- बडनेरा मेमूला कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरीचे पत्रही मिळाले आहे. परंतु, भुसावळ विभागीय कार्यालयाकडून त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही.- स्मिता वाघ (खासदार, जळगाव)