नाशिक : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यास सांगितल्याने फसवणूक झालेल्या तक्रारदारास दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून देण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नाशिक शहरातून एका भामट्याला अटक केली. सिन्नर येथील व्यापाऱ्याशी सायबर भामट्याने व्हॉट्स अप क्रमांकावरून संपर्क करत क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यांना एका ॲपची लिंकही पाठवली.
व्यापाऱ्याने त्यानुसार लिंक उघडली असता त्यांच्या भ्रमणध्वनीत बीनानसी या नावाने ॲप डाऊनलोड झाले. यानंतर ठरल्याप्रमाणे विविध संकेतस्थळावर त्यांनी पैेसे गुंतवले. विविध बँक खात्यांवर तक्रारदाराने ६४ लाख ८० हजार ५०० रुपये गुंतविले. परंतु, परतावा किंवा गुंतवलेली रक्कम काढता येत नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण सायबर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे, पोलीस शिपाई सुनील धोक्रट आदींनी केला. शहरातून पोलिसांनी अमेय जैन (२९, रा. काळे नगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख दोन हजार रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले.
नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने व्यवहार करतांना काळजी घ्यावी, आपला ओटीपी देवाण-घेवाण करू नये, बँक खात्याविषयी अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नये. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. तसेच ऑनलाईन १९३०, १९४५, १४४०७ किंवा सायबर पोलीस ठाणे ०२५३- २२००४०८, ७६६६३१२११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.