नाशिक : जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. नवरात्रोत्सवात तर नऊ दिवस सप्तश्रृंग गड गर्दीने फुलून गेलेला असतो. त्याचप्रमाणे दिवाळीत मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंग गडावर जात असतात. दिवाळीनिमित्त दूरवरुन येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांकडूनही स्वागत होत आहे.

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांसह अहिल्यानगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या असल्याने तसेच सरकारी कर्मचारी, कामगार वर्गालाही सुट्या असल्याने या पार्श्वभूमीवर, सप्तश्रृंग गडावर दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकरिता प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मंदिरात स्वच्छतेवर भर, दर्शन रांगेमुळे गोंधळ टाळण्यासाठी नियोजन, रोप वेची सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना आरामात दर्शन घेता येणार आहे. भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यावर नियोजनात काहीवेळ अडथळा निर्माण होतो. मंदिराच्या नियमित वेळेत मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या सर्वच भाविकांना दर्शन घेता येणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. हे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सप्तश्रृंगी देवीचे मंदिर २२ ऑक्टोबरपासून सहा नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी पाच वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. भाविक रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन घेऊ शकतील. या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय दूर होऊन मंदिर प्रशासनाला गर्दीचे नियोजन करणेही श्रेयस्कर होणार आहे.

गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ भाविकांसाठी रोप वे सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधाही मंदिर उघडल्यापासून म्हणजेच सकाळी पाच वाजल्यापासून रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवाळीच्या सणात भक्तांसाठी मंदिर प्रशासनाने अनेक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे भक्तांना दर्शनासाठी मोठी गर्दी, उशीर किंवा गैरसोय भासणार नाही. भक्तांनी मंदिराच्या वेळापत्रकानुसार दर्शनासाठी यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भक्तांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.