नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतच घमासान सुरु असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती राहील की नाही, हाच प्रश्न राजकीय क्षेत्रात विचारला जात आहे. भाजपचे आमदार तथा ज्येष्ठ नेते डाॅ. विजयकुमार गावित यांनी यासंदर्भात थेट निर्णयच जाहीर केल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आता निवडणुकीच्या कामाला लागण्यास तयार झाले आहेत.नंदुरबार येथे भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत मंगळवारी नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तिलाली, तलवाडे आणि इंदरहद्दी परिसरातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपने गत काळात केलेला विकास आणि आपण मंत्री असतांना केलेल्या कामांवर विश्वास ठेवून जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला जमत असेल तर महायुती करा अथवा स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, अशा सूचना दिलेल्या असल्याने जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा आणि धडगाव – अक्कलकुवा मतदारसंघात युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. विजयकुमार गावित यांचा रोख हा थेट शिवसेना शिंदे गटाकडे असून नंदुरबारच्या राजकारणा ते भाजपचा केंद्रबिंदु मानले जातात. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यावेळी त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रीमडंळात त्यांना राज्याच्या आदिवासी विकास खात्याची धुरा देण्यात आली होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले डाॅ. गावित यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात होता. देवेंद्र फडवणीस यांनी यंदा पुन्हा डॉ. विजयकुमार गावितांना मंत्रीपदापासून दुर ठेवल्याने भाजपमध्ये डॉ. गावितांना अंतर्गत विरोध करणाऱ्या गटाबरोबरच विरोधी असलेल्या शिंदे गटासह सर्वांनाच मोठा आनंद झाल्याचे पहावयास मिळाले.

अशातच लोकसभा निवडणुकीत डाॅ. विजयकुमार गावित यांची मुलगी डॉ. हिना गावित यांचा झालेला पराभव, त्यांनतर दुसरी मुलगी डॉ. सुप्रिया गावित हिचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा संपलेला कार्यकाल, यामुळे शक्तीशाली मानले जाणारे डॉक्टर गावित परिवाराचे घर सत्तेत असून देखील रिकामे झाल्याचे दिसून आले.

मात्र आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने डॉ. विजयकुमार गावितांनी भाजपला सत्ता मिळावी, यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांमुळेच त्यांनी आता आपल्या मुलीला पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रीय केले असून अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा सपाटा लावला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या शिंदे गटाला यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत दूरच ठेवण्यासाठी डॉ. विजयकुमार गावित आग्रही आहेत.