मालेगाव : गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पोलीसांतर्फे सुरू असलेल्या कारवाया सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दुसर्‍या बाजूला अवैध धंदे करणार्‍यांचे निर्ढावलेपण देखील समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे चक्क किराणा दुकानात गांजा विक्री करण्याचा असाच प्रकार पोलीसांनी उघडकीस आणला आहे. पोलीसांनी संशयीताला मुद्देमालासह अटक केली आहे.

सौंदाणे परिसरात काही दिवसांपासून गांजा विक्री होत असल्याची चर्चा होती. त्या संदर्भात अधिक माहिती घेतली असता गावातील इंदिरानगर भागात असलेल्या किराणा दुकानात गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव तालुका पोलीसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता संबंधित किराणा दुकानात खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे आढळून आले.

विक्री करणे सुलभ व्हावे म्हणून प्लास्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये हा गांजा भरून ठेवण्यात आला होता. तसेच या पिशव्यांची साठवणूक गोणीमध्ये करण्यात आली होती. वजन केले असता ८ किलो ९२० ग्रॅम वजनाचा हा सर्व माल भरला. बाजारभावाप्रमाणे या मालाची किंमत एक लाख ७८ हजार ४०० रुपये आहे. याशिवाय दुकानात गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या एकूण ५० चिलीम देखील आढळून आल्या. गांजा, १० हजाराची रोख रक्कम, मोबाइल, चिलीम असा एकूण दोन लाख ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

किराणा दुकानाचा मालक नीलेश बापू पवार (३०, सौंदाणे) यास अटक करण्यात आली आहे. मनुष्याच्या मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा नावाच्या अंमली पदार्थाची विक्री व कब्जात आढळून आल्याने मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नीलेश विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब),२०II (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, तुषार भदाणे व दामोदर काळे, तसेच अंमलदार विनोद टिळे, सतीश घुटे, आबा पिसाळ, सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, किरण पाटील आदींचा पथकात समावेश होता.