PM Modi Nashik Visit Updates नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहर व परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ३५० अधिकारी आणि चार हजार कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावत संबंधितांवर करडी नजर ठेवली आहे. काहींना ताब्यात घेतल्याची तक्रार केली जात आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तत्पुर्वी ते पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन आणि रामकुंडावर गोदावरी पूजन करणार आहेत. याच दरम्यान त्यांचा दोन किलोमीटरचा रोड शो होणार आहे. या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. बाहेरील जिल्ह्यांमधून अधिकची कुमक दाखल झाली आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३५० अधिकारी, चार हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या असा फौजफाटा तैनात राहणार आहे.

आंदोलकांवर नजर

कांदा निर्यात बंदीवरून राज्यातील शे्तकरी संघटनांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. या संघटनांशी यंत्रणेने चर्चा करून आंदोलन होऊ नये म्हणून प्रयत्नही केले. परंतु, काही संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यात कांदा वा तत्सम कृषिमालाच्या प्रश्नावरून नेहमी आंदोलन करणाऱ्यांचा समावेश आहे. या दौऱ्यात बेकायदेशीर आंदोलन वा कृत्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित संघटनेचे पदाधिकारी जबाबदार राहतील, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहर व ग्रामीण पोलिसांकडून अनेकांना अशा नोटिसा पाठविल्या गेल्या असून काहींची धरपकड करण्यात आल्याची तक्रार केली केली जात आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : “नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य”, संजय राऊतांचा हल्लाबोल

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व शुक्रवारी शहर परिसरात विविध ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने १६ जानेवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध केला आहे. संपूर्ण जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.