जळगाव : प्रफुल्ल लोढा यांना अडकविण्याचे षडयंत्र एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांनी रचल्याचा खळबळजनक आरोप पवन लोढा यांनी केल्यानंतर हनी ट्रॅप प्रकरणाला नवे मिळाले आहे. दरम्यान, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना जाऊन भेटल्यानंतर पवन लोढा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सूर बदलल्याचा आरोप खडसे यांनी आता केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संशयित प्रफुल्ल लोढा याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर जामनेर तालुका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप करत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचे लोढासोबत जुने आणि घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर हनी ट्रॅप प्रकरणात महाजन यांचा थेट सहभाग असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. परिणामी, हनी ट्रॅप प्रकरणाने आता केवळ पोलीस चौकशीपुरते मर्यादित न राहता राजकीय वादळाचे स्वरूप घेतले आहे.
दुसरीकडे, प्रफुल्ल लोढा विरोधात बलात्कारासह हनी ट्रॅपसारख्या गंभीर आरोपांच्या आधारे गुन्हे दाखल झाल्यानंतर लोढा कुटुंबाकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. लोढा यांचा मुलगा पवन लोढा याने पत्रकारांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय सूडभावनेचा आरोपही केला आहे. माझ्या वडिलांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे खोटे आहेत. हनी ट्रॅप प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही.
जर खरोखरच आमचा अशा कुठल्या प्रकरणात हात असता, तर आज आम्ही पैशात खेळलो असतो. पण वस्तुस्थिती ही आहे की, आज आमच्याकडे काहीच नाही, असेही पवन लोढा याने म्हटले आहे. हा सर्व प्रकार केवळ प्रसिद्धीसाठी रचलेला आहे. आणि त्यामागे मोठे राजकीय षढयंत्र असल्याचा आरोप करून थेट एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांवर त्याने संशय व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन आणि त्यांचे कुटुंबीय आतापर्यंत काही बोलत नव्हते. मात्र, मागील आठवड्यात ते मंत्री गिरीश महाजन यांना जाऊन भेटले. त्यानंतर त्यांचा सूर बदलला. याचे कारण तुम्ही समजू शकता, असे एकनाथ खडसे यांनी त्या विषयावर बोलताना सांगितले. खडसेंच्या या नव्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. आता ते खडसे यांनी केलेल्या नवीन आरोपावर काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.