जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील मुक्ताई बंगल्यात धाडसी चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ७० ते ८० ग्रॅम सोने तसेच ३५ हजार रूपयांची रोख असा मुद्देमाल चोरीस गेल्याची माहिती स्वतः खडसे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरात शिवरामनगरात एकनाथ खडसे यांचा प्रशस्त बंगला आहे. एरवी संपूर्ण खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे वास्तव्यास असते. त्यामुळे जळगावमधील त्यांच्या बंगल्यात कामाशिवाय फार कोणाचा वावर शक्यतो नसतो. बंगल्याच्या देखभालीसाठी एका रखवालदाराची नेमणूक मात्र तिथे केली आहे. दिवाळीच्या धामधुमीत बंगल्याच्या देखभालीची जबाबदारी असलेला रखवालदार सुद्धा सुटीवर होती. ही बाब लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांनी रेकी करून रात्रीच्या वेळी खडसेंच्या बंगल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्यासह केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त फेकून ७० ते ८० ग्रॅम वजनाचे सोने तसेच कपाटातील ३५ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.

मंगळवारी सकाळी रखलवालदार बंगल्यावर पोहोचल्यानंतर खडसेंच्या बंगल्याचे कुलूप तोडून आतमधील सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे त्याचया लक्षात आले. त्याने खडसे कुटुंबियांना त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. चोरीची घटना किती वाजता आणि कोणत्या दिवशी घडली याबद्दल काहीच सांगता येणार नाही. कारण चोरी झाली तेव्हा नेमका रखवालदार जागेवर हजर नव्हता. त्यामुळे ठोस माहिती सांगता येणार नाही. चोरट्यांनी निवांत सर्व खोल्या तपासलेल्या दिसत आहेत तसेच शांततेत सर्व कुलपे तोडलेली आहेत, असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वीच, मुक्ताईनगरात राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा रक्षा ऑटो फ्युएल्स पेट्रोल पंपावर मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. त्याचप्रमाणे केबिनमध्ये तोडफोड करत एक लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम लुटली होती. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी सुनेच्या पेट्रोल पंपावरील दरोड्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप केला होता. राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुन्हेगार एवढी हिंमत करू शकत नाही, असे म्हटले होते. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीच संपत्ती सुरक्षित नसल्यावर सर्व सामान्य नागरिकांचे काय, वर्दळीच्या ठिकाणी भरवस्तीत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री अकाराच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहे, असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे.