नाशिक : निवडणूक प्रक्रियेत विविध मुद्यांवरून राजकीय पक्षांनी आधीच आक्षेप नोंदविले असताना निवडणूक यंत्रणेने यात पारदर्शकता जपण्यासाठी धडपड चालवली आहे. मतमोजणी प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ नये म्हणून नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात प्रत्येक केंद्रावर वापरलेले मतदान यंत्र (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्ही पॅट) यांचे अद्वितीय क्रमांक उमेदवारांना देण्यात आले आहेत. मतमोजणीवेळी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना त्यांची पडताळणी करता येणार आहे.

नाशिक, दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणी चार जून रोजी अंबडस्थित वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. या ठिकाणी सर्व मतदानयंत्र त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने या क्षेत्रात उमेदवारांचे प्रतिनिधी व स्थानिक अधिकारी बरोबर असल्याशिवाय तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. संबंधितांकडून मतदान यंत्रात फेरफार होण्याची साशंकता वर्तविली गेली होती. देशासह राज्यात विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, मतमोजणी प्रक्रियेत आक्षेप नोंदविले जाऊ नयेत याची खबरदारी यंत्रणेकडून घेतली जात असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…नाशिक: खोदकामामुळे अंबडमध्ये गॅस वाहिनीला गळती

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ही प्रक्रिया पार पाडताना घ्यावयाची काळजी, उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यास कार्यपध्दती यावर मार्गदर्शनपर सूचना करण्यात आल्या. नाशिक मतदारसंघात एक हजार ९१० तर, दिंडोरीमधील एक हजार ९२२ केंद्रांवर मतदान झाले. नाशिकच्या जागेसाठी ३१ तर दिंडोरीत १० उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानात वापरलेल्या यंत्रांची यादी निवडणूक यंत्रणेने उमेदवारांना लिखीत व इ मेलद्वारे दिली आहे.

हेही वाचा…नाशिक: वाहन तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांकडून वरात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मतदानात वापरलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्ही पॅट यंत्रांचे अद्वितीय क्रमांक मतमोजणीआधीच उमेदवारांना देण्यात आले आहेत. मतमोजणीत कुठल्या केंद्राचे यंत्र कुठल्या टेबलवर येईल, याची माहिती त्यांना दिली गेली आहे. मतमोजणीवेळी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची खात्री झाल्यानंतर मतदान यंत्र उघडले जातील, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगितले जात आहे. उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्याची तयारी करण्यात आली आहे.