मालेगाव : गेल्या वर्षीच्या दिपवाळीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘आनंदाचा शिधा ‘ ही योजना सुरू केली होती. यावेळी मात्र निधीची चणचण हे कारण देऊन सरकारने ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी ‘आनंदाचा शिधा’ बंद होणे हा निर्णय ऐन दिपवाळीत सरकार पुरस्कृत गरिबांवर लादलेला अंधार असल्याची टीका केली आहे. सरकारची ही कृती ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशा धाटणीतील आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
एकीकडे बाजारपेठांमध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या घरांवर मात्र अंधार दाटला आहे. त्यामुळे शासनाने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना पुनश्च सुरू करावी, असा आग्रह चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे धरला आहे. ही योजना गोरगरीबांसाठी दीपावलीच्या काळात आर्थिक दिलासा देणारी होती.
पण आता जनतेच्या दिवाळी उत्सवात प्रकाशाऐवजी नैराश्य भरले जाणार आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, महागाई आणि बेरोजगारीमुळे आधीच पिचकून गेलेल्या सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढण्याचे पाप महायुती सरकार करत असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजनेद्वारे राज्यातील १ कोटी ६३ लाख लाभार्थ्यांना रवा, साखर, डाळ, तेल आणि तूप मिळत होते. ही योजना गरीबांसाठी ‘आनंदाचा दीप’ ठरत होती. मात्र, आता या योजनेचा दिवा सरकारनेच विझवला आहे. आर्थिक तुटीमुळे आणि इतर योजनांवरचा खर्च वाढल्यामुळे ही योजना थांबवल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र ‘लाडकी बहीण’ सारख्या अन्य योजनांसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देणारे सरकार गरीबांच्या शिध्यासाठी पैसा नाही, म्हणत असेल तर तो दुटप्पीपणा ठरतो, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेचाही बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. अनेक केंद्रांचे अनुदान थकले असून काही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या दोन योजना बंद झाल्यामुळे गरीब व मजूर वर्गाला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. गावोगावी सुरू असलेली स्वस्त थाळी बंद झाल्याने कामगार वर्गाला दोन वेळच्या जेवणासाठी मोठे कष्ट सोसावे लागत आहेत.
सरकारकडून लोकप्रिय योजनांचा केवळ देखावा केला जात असून, प्रत्यक्षात गोरगरीबांसाठीच्या योजनांची गळचेपी सुरू आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यातील तफावत स्पष्ट दिसत आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न निवेदनात केला आहे.