जळगाव – शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्‍याच्या अंगावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे घडली. या मृत्यूस वाळूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मृतदेह थेट तहसील कार्यालयात नेण्यात आला. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेतकरी जयवंत कोळी (३६) हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर गेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने नातेवाईक आणि ग्रामस्थांना दिली. कोळी यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाला होता. तक्रार करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने कोळी यांचा जीव गेल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – नाशिक : नीलेश राणे यांना अटक करा ; ठाकरे गटाची पोलिसांकडे मागणी

हेही वाचा – नाशिक : कातकरी समाजाच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही ; उभाडेत हक्काचे घरकुल मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाइकांनी अमळनेर तहसील कार्यालयात नेला. सर्व संशयितांना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, मृत जयवंत कोळी यांची पत्नी शुभांगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड येथील पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.