जळगाव – शासनाने लागोपाठ दोन जीआर काढून जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके नैसर्गिक आपत्तीने बाधित घोषीत केले असले, तरी चोपडा आणि यावल तालुक्यांना त्यातून वगळले आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

शासनाने नऊ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार, नैसर्गिक आपत्तीच्या विशेष मदतीचे पॅकेज आणि अनुषंगिक सवलती देण्यासाठी जिल्हानिहाय तालुक्यांची यादी जाहीर केली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने महाविकास आघाडीने शासन निर्णयाचा निषेध नोंदवत ठिकठिकाणी निदर्शने केली. त्यानंतर परिस्थिती आणखी जास्त चिघळण्याची चिन्हे दिसून आल्याने शासनाने दुसऱ्याच दिवशी १० तारखेला दुसरा जीआर काढला.

ज्यामध्ये जिल्ह्यातील १३ तालुके नैसर्गिक आपत्तीने बाधित झाल्याने अनुषंगिक सवलतींना पात्र असल्याचे दाखविण्यात आले. चोपडा आणि यावल या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या दोन तालुक्यांना मात्र सोयीस्करित्या वगळले. जिल्ह्यातील इतर १३ तालुक्यांत आणि चोपडा, यावल तालुक्यात कमी-अधिक फरकाने जवळपास सारखीच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची स्थिती आहे. त्यानंतर देखील विशेषतः चोपडा तालिका बाधित तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला. 

नैसर्गिक आपत्तीने बाधित तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर शासनाच्या मदतीचे पॅकेज जाहीर होऊन नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकऱ्यांना थोडा फार आधार मिळण्याची आशा होती. मदतीच्या पॅकेजमधून हाती आलेल्या पैशांवर पुढील रब्बी हंगामाची तयारी करता येईल, असे सर्वांना वाटले होते. मात्र, बाधित तालुक्यांच्या यादीतूनच शासनाने चोपडा तालुक्यास वगळून टाकले.

एकूण सर्व प्रकार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करण्यात आला आहे, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध केला. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान लक्षात घेता चोपडा तालुक्याला तातडीने नैसर्गिक आपत्तीने बाधित घोषीत करावे, अशी मागणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अन्यथा मोठे जन आंदोलन

चोपडा तालुका नैसर्गिक आपत्तीने बाधित घोषीत न झाल्यास लवकरच मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व केले. कुलदिप पाटील, सुनील महाजन, सुधाकर महाजन, अविनाश महाजन, विष्ण पाटील, हिरालाल चौधरी, राजमल महाजन, रमेश चौधरी, रमेश चौधरी, सुधाकर चौधरी, विठ्ठल महाजन, शांताराम पाटील, कल्पेश महाजन, निखिल महाजन, दिलीप धनगर, जगदीश शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.