जळगाव – राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष विरहित असलेल्या या मोर्चातून केळी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे देखील उपस्थित राहणार आहेत.

नाशिकमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस उत्पादकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. कारण, जळगावमधील केळी, कापूस उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड संकटात सापडले आहेत. शेतकरी मेहनतीने केळी, कापसाचे पीक घेतात; परंतु, बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे यामुळे उभी पिके जमिनदोस्त होत असल्याने दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत.

दरम्यान, पीकविमा योजना शेतकऱ्यांना आधार देईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. प्रत्यक्षात विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांवरील आकडेवारीतून प्रत्यक्ष परिस्थितीचे अचूक प्रतिबिंब उमटत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पीक नष्ट होऊनही योग्य ती नुकसान भरपाई मिळत नाही. दोष स्वयंचलित हवामान केंद्राचा असताना त्याचे नुकसान मात्र शेतकऱ्यांनाच सोसावे लागते.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असताना सरकारला जागे करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. केळी, कापूस उत्पादक शेतकरी जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल. हा आक्रोश मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला इशारा असल्याचे माजी खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यात यावे आणि स्वयंचलित हवामान केंद्रांच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून केली जाणार आहे. सदरचा मोर्चा पक्ष विरहीत असल्याने त्यात कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जळगावमध्ये दोन वर्षांपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळावा, या मागणीसाठी शरद पवार गटाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यात हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाडीसह सहभागी होऊन सरकारचे लक्ष वेधले होते. याशिवाय, ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावमध्ये गेल्याच महिन्यात जन आक्रोश मोर्चा काढून महायुती सरकारची प्रतिकात्मक तिरडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

प्रसंगी पोलिसांनी जाळपोळ करण्यास मनाई केल्यानंतरही आंदोलक मागे हटले नव्हते. तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना रमी गेम खेळत असतानाची चित्रफीत माध्यमांवर व्हायरल झाली होती. प्रत्यक्षात, महायुतीने त्यांचा राजीनामा घेतला नाही आणि फक्त खाते बदल करून वेळ मारून नेली. त्याबद्दलही सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडला होता.