लोकसत्ता वार्ताहर 

धुळे: तालुक्यातील नेर येथे प्रार्थनास्थळाची विटंबना प्रकरणी अल्पवयीन मुलासह पाच समाजकंटकांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. जुन्या वादातून हा प्रकार केल्याची कबुली पाचही जणांनी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. या संदर्भात पत्रकार परिषदेत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी माहिती दिली.

दोन ते तीन जून या दरम्यान पहाटे नेर येथे प्रार्थनास्थळाची विटंबना करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक संशयित पुणे येथील एमआयडीसीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार प्रवीण पाटील, मुकेश पवार, रवींद्र माळी, प्रमोद ईशी यांच्या पथकाने पुणे येथून गणेश शिरसाठ (२२) याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी भीमराव कुंवर (३६), विक्की कोळी (२१), रोहित जगदाळे (२१) आणि एक अल्पवयीन मुलगा, अशा चौघानाही ताब्यात घेतले.

हेही वाचा… नाशिक: हॉटेलमधून दोन परप्रांतीय बाल कामगारांची सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौघांपैकी भीमरावने संबंधित कृत्य केल्याचे इतरांनी सांगितले. अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चौघा समाजकंटकांना अटक झाली असून अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निरीक्षक शिंदे यांनी दिली. दरम्यान, समाजकंटकांना अटक केल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तालुका पोलिसांना १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले.