नाशिक – सलग १७ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून नाशिकच्या पुराचे निदर्शक मानला जाणारा दुतोंडी मारूती बुडाला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कधीकाळी ६४ हजार क्युसेक पाणी वाहून नेणारे गोदावरीचे पात्र आता २० ते २५ हजार क्युसेकमध्ये पूरस्थिती निर्माण करते, असे दिसून येते.

नाशिक शहराला २००८, २०१६ आणि २०१९ या वर्षी महापुराचा तडाखा बसला होता. पुराचे रुपांतर महापुरात होण्यास विविध घटक कारक ठरतात. सप्टेंबर महिन्यात पूर वा महापुराचा अधिक धोका असतो. कारण, धरण परिचालन सूचीनुसार बहुतांश धरणे तुडूंब भरलेली असतात. अकस्मात पाऊस झाल्यास पाणी साठवण्यासाठी जागा नसते. अशावेळी धरण सुरक्षित ठेवण्यासाठी विसर्ग क्रमप्राप्त ठरतो. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाटबंधारे विभागाने अंदाज घेत गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्याचे ते कारण आहे. गंगापूरमधील विसर्ग आणि त्याचवेळी मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली. रविवारी दुपारी गोदा पात्रातून १३ हजार ४५ क्युसेकने प्रवाह सुरू असून नदीने इशारा पातळी ओलांडल्याचे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी म्हटले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. होळकर पुलाखाली गोदावरीची धोका पातळी १८४९.०० फूट आणि १९ हजार ७९ क्युसेक इतका धोका विसर्ग आहे.

सध्याच्या १३ ते १४ हजार क्युसेकच्या प्रवाहाने गोदावरीला पूर आल्याचे चित्र समोर आले. शहरातील गोदावरी पात्रातील प्रवाह ८० हजार (होळकर पुलाखालील प्रवाह) क्युसेकच्या आसपास गेल्यास महापुरासारखी स्थिती निर्माण होते असे आजवरच्या आकडेवारीवरून दिसून येते. १९६९ मध्ये गंगापूर धरणातून ६६ हजार क्युसेक पाणी सोडले गेले होते. मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणी पात्रात येते. तेव्हा सरकारवाड्याच्या १३ व्या पायरीपर्यंत पाणी लागले. २००८ मध्ये गंगापूर धरणातून ४२ हजार क्युसेक पाणी सोडण्यानंतर पूरपाण्याने ती पातळी गाठली होती, याकडे पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी लक्ष वेधले. सराफ बाजार व नदी काठावरील बाजार पेठांमध्ये पाणी शिरले होते. २००८ मध्ये सप्टेंबरमध्ये म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना नाशिकला महापुराचा तडाखा बसला होता. परंतु, पुढील २०१६ आणि २०१९ या वर्षात तर, ऑगस्टमध्ये महापुराला तोंड द्यावे लागले होते. या दोन्ही वर्षात सलग दोन, तीन दिवस अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळल्याने धरणांतून सुमारे ४४ हजार क्युसेक इतका विसर्ग करावा लागल्याचे याच विभागाचे अन्य अधिकारी सांगतात.

अतिक्रमण, कमी उंचीचे पूल, नदीपात्रात टाकला जाणारा भराव आदी कारणांनी गोदावरीसह तिच्या उपनद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी गोदावरी गंगापूर धरणमार्गे नाशिक शहरातून पुढे मराठवाड्याच्या दिशेने मार्गस्थ होते. या प्रवासात नाशिक शहरात नदी पात्राचा ठिकठिकाणी संकोच झाला आहे. २००८ मधील महापुराच्या चौकशीत या संदर्भातील कारणे समोर आली होती. रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत महापालिकेने नदीपात्रात अनेक घाट सिमेंट क्रॉक्रीटमध्ये बांधले आहेत. होळकर पुलाखालील बंधाऱ्याने मागील भागात फुगवटा निर्माण होतो. कमी उंचीचे पूल, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदा पार्क, गोदावरी सौंदर्यीकरणासाठी निळ्या रेषेत महापालिकेने राबविलेल्या प्रकल्पांनी गोदावरीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणले. बांधकाम व्यावसायिकांनी अनेक नैसर्गिक नाले बुजवल्याने पाण्याचा निचरा होत नाही. अनेक निवासी भाग वा रस्त्यांवर पाणी येण्याचे ते कारण आहे. नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. महापुरासारखी स्थिती उद्भवणार नसल्याचे मत उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले.