नाशिक : दिवाळी म्हणजे सुट्टी. सुट्टीचा कालावधी कमी असला तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी आर्थिक क्षमतांचा विचार करत भटकंतीचा पर्याय अनेकांकडून निवडला जातो. यंदाही लक्ष्मीपूजनानंतर तसेच त्याआधीही सुट्टीत बाहेर पडण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. यंदा देशातंर्गत प्रवास दरात वाढ झाल्याने अनेकांनी बाहेरील देशात जाण्यास पसंती दिली आहे. दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी सुट्टीत बाहेर पडणाऱ्यांची गर्दी पाहता जादा बससेवेचे नियोजन केले आहे.

दिवाळीच्या सुट्टींमध्ये भटकंतीला प्राधान्य देण्यात येऊ लागले आहे. आपआपल्या आवडीनुसार पर्यटकांकडून ठिकाणे निवडली जातात. रोजच्या कामातील ताण, मुलांमागील अभ्यासाची दगदग आणि महिला वर्गाला नेहमीच्या कामातून काही दिवस विश्रांती मिळावी, यासाठी दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन केले जाते. आपआपल्या आर्थिक क्षमतांचा विचार करता भटकंतीची ठिकाणे ठरवली जातात. यंदा देशाअंतर्गत प्रवास दर त्यातही विमानाच्या प्रवास दरात मोठी वाढ झाल्याने अनेक कुटूंबांकडून तितक्याच खर्चात जर परदेशात जाता येत असेल तर, परदेश दौरा का करु नये, असा विचार केला जात आहे. त्यामुळे दुसऱ्या देशात पर्यटनासाठी पसंती दिली जात आहे. याविषयी नाशिक ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझम संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी माहिती दिली.

देशातंर्गत विमान प्रवासाचे दर वाढले आहेत. विमान प्रवासाचे दर कधीही वाढतात. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानाने जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांमध्ये दुसऱ्या देशात जाता येणे शक्य असल्याने अनेक जण परदेशात जाण्याला पसंती देऊ लागले आहेत. थायलंड, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलेशिया या ठिकाणी भारतीय पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. पर्यटकांना अधिक प्रमाणात आकर्षित करण्यासाठी यापैकी काही देशांनी व्हिसा मोफत केला आहे. दुसरीकडे, कोकण, गुजरातमधील स्टेच्यु ऑफ युनिटी, देशातील कुठलेही ज्योर्तिलिंग, अशा काही ठिकाणे जिथे गाडीने जाणे शक्य आहे, अशी ठिकाणेही पर्यटकांची आवडीची होऊ लागली आहेत. नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी इतर जिल्हे आणि राज्यांमधून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत असल्याचे भालेराव यांनी सांगितले.

दिवाळीसाठी जादा बससेवा

दिवाळी सुट्टीत पर्यटक तसेच प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बससेवेचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १५ आगारांकडून उत्तर महाराष्ट्रासह, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी आदी ठिकाणी बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. याशिवाय नाशिकहून सटाणा, बोरिवली, सप्तश्रृंगी गड, त्र्यंबक, शिर्डी या मार्गावर इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक-शिवाजीनगर, नाशिक-धुळे या मार्गावर दर पंधरा मिनिटांनी आणि नाशिक- छत्रपती संभाजी नगर, नंदुरबार, सटाणा मार्गावर अर्ध्या तासाने बससेवेचे नियोजन आहे. याशिवाय महामंडळाच्या वतीने आवडेल तिथे प्रवास योजनेतंर्गत चार ते सात दिवस या कालावधीसाठी पास देण्यात येत आहे. या पासच्या दरात कपात करण्यात आली आहे. प्रवाशांनी महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी केले आहे.