नाशिक : वडनेर गेट परिसरातील आर्टिलरी सेंटरमध्ये वनविभागाला आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईत आतापर्यंत सात बिबटे जेरबंद झाले आहेत स्थानिक पातळीवर झालेल्या पाठपुराव्यामुळे आणि वनविभागाच्या कार्यपध्दतीमुळे ही कारवाई शक्य झाली. वडनेर गेट परिसरातील आर्टिलरी सेंटरमध्ये महिन्यापूर्वी बिबट्याने दोन वर्षीय बालकाला उचलून नेले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरात रास्ता रोकोआंदोलन केले होते. बिबट्याचे वाढते हल्ले पाहता आर्टिलरी सेंटर, वडनेर गेट, पिंपळगाव परिसरातील काही भागांमध्ये बिबटे जेरबंद होण्यासाठी पिंजरे लावण्यात आले.

याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. बिबट्याने या परिसरातील पशुसंपत्ती तसेच मानवी वस्तीवर सुरू ठेवलेले हल्ले पाहता पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास येथे लावलेल्या एका पिंजऱ्यात सातवा बिबट्या अडकला.
परिसरातील नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरूळ येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी, बिबट्या नर असून साधारणत: तीन ते चार वर्षांचा असल्याचे सांगितले. नागरिकांनी रात्रीच्या वेळी तसेच पहाटे अंधारात बाहेर पडू नये. बिबट्याचा वावर लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

बिबट्याचे हल्ले

नाशिक शहर परिसरात काही महिन्यांपूर्वी रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर परिसरातील आयुष भगत येथे चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्लात आयुष याचा मृत्यू झाला. या हल्लानंतर संतप्त नागरीकांनी रास्तारोको केला. वनविभागावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी बिबट्या जेरबंद झाला. यानंतर वनविभागाकडून वडनेर दुमाला, जयभवानी रोड, सय्यद मळा यासह अन्य भागात पिंजरे लावण्यात आले. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातूनही बिबट्याचा शोध सुरू राहिला. काही ठिकाणी बिबट्या दिसला. वनविभागाच्या वतीने बिबट्या बेशुध्द करत काही ठिकाणी पिंजऱ्यात बंदिस्त करत बिबट्या ताब्यात घेण्यात आला. आत्ता पर्यंत सात बिबटे जेरबंद करण्यात आले आहे.