नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सोडावी, असे आवाहन माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले आहे. येथे गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माकपचे डॉ. डी. एल. कराड, सुनील मालुसरे उपस्थित होते. केंद्रीय पातळीवर इंडिया तर राज्य पातळीवर महाविकास आघाडीबरोबर माकप काम करत आहे.
राज्यात आघाडीने एक जागा माकपसाठी सोडावी. सोलापूर, पालघर, दिंडोरी ही बलस्थाने आहेत. माकपकडून दिंडोरीसाठी आग्रह धरला जात आहे. केंद्रीय समितीही यासाठी आग्रही आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. माकपने जे लढे दिले, संघर्ष केला, जनतेमध्ये जावून काम केले आहे. लाल बावटा हा भाजपविरोधी मतदान करतो. हे सर्व लक्षात घेता ही जागा माकपसाठी सोडावी, अशी मागणी गावित यांनी केली.
हेही वाचा…नाशिकच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला; हेमंत गोडसे यांच्यावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप
भाजपला थांबवण्याची गरज आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. परंतु, त्यांनी ही जागा राष्ट्रवादीसाठी योग्य असल्याचे सांगितले आहे. या पाश्वर्भूमीवर दिंडोरीची जागा न मिळाल्यास केंद्रीय समितीचा निर्णय मान्य असेल, असे गावित यांनी नमूद केले. डॉ. कराड यांनी, पक्षाच्या वतीने कोण, कुठून निवडून येईल याची चाचपणी झाली असून त्यात दिंडोरीसाठी जीवा पांडू गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगितले. ही जागा न मिळाल्यास केंद्रीय समिती सांगेल त्यानुसार पक्ष काम करेल, असे डॉ. कराड यांनी नमूद केले.