नाशिक – शिवसेनेतील (उध्दव ठाकरे) माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी भाजपने आपले दरवाजे खुले केल्यानंतर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ठाकरे गटातील शक्य तितक्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. ज्या दिवशी भाजप ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना प्रवेश देणार होते, त्याच दिवशी ठाकरे गटाच्या चार माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात सामील करण्याची स्पर्धा लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नाशिकमधील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविका किरण दराडे, मनपाच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सीमा निगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगळे, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला

धनुष्यबाण आणि शिवसेनेशी नाशिककरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आजच्या प्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. मागच्या निवडणुकीत तुमचे चिन्ह धनुष्यबाण होते. आणि आताही धनुष्यबाणच मिळणार आहे. तुम्ही सर्व स्वगृही परतला आहात, अशा शब्दांत माजी नगरसेवकांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटावर टिकास्त्र

राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातील सरकार आणले. तेव्हापासून त्यांनी फक्त आरोप आणि टीका केली, मात्र टिकेला आम्ही कामातून उत्तर दिले. त्यामुळे जनता काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली, घरात बसणाऱ्यांच्या नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.