नाशिक – सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांचा जलसाठा २५ हजार २०२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ६२ टक्क्यांवर गेल्याने धरणातील विसर्ग ६१६० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर या धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात इतरत्र केवळ जळगावच्या हतनूर धरणातून विसर्ग होत आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २३ जून या कालावधीत सरासरी १६८ मिलीमीटर नोंद झाली. इगतपुरी आणि मालेगाव या तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्याने धरणसाठा उंचावत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ३१ टक्के अधिक जलसाठा आहे. धरण परिचालन सुचीनुसार जून महिन्यात धरणात किती जलसाठा ठेवायचा, हे निश्चित असते. काही धरणांनी ती पातळी ओलांडल्याने विसर्ग करण्यात आला.
मंगळवारी गंगापूरमधून ६१६०, दारणातून ४७४२, कडवा १०६० आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५७७५ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, २० वर्षांपूर्वी २००५ मध्ये जूनच्या अखेरीस सलग काही दिवस पाऊस झाल्यामुळे गंगापूरमधून विसर्ग करण्यात आला होता. यावेळी तत्पूर्वीच पाणी सोडावे लागल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी दुथडी भरून वहात आहे.
दुसरीकडे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीनही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या दोन दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत आहे.