नाशिक : धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील आंबा गाव शिवारातील रुपसिंगपाडा येथे वनजमिनीवर व्यापाराच्या उद्देशाने गांजा या अमली वनस्पतीची लागवड करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सुमारे दोन कोटी २० लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गांजा शेतीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित भागात पाहणी करून खात्री केली. यानंतर पोलीस पथक आंबा (ता.शिरपूर) येथील रुपसिंगपाडा येथे पोहोचले. तपासणीत कैलास पावरा (रा.आंबा, ता. शिरपूर, धुळे) याने व्यापार करण्याच्या उद्देशाने गांजा शेती केलेले आढळले.

त्याने वनजमिनीचा अवैधरित्या वापर केलेला असल्याने स्थानिक गुन्हे शाखा धुळे आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे कारवाईचे नियोजन केले. कारवाईसाठी पोलिसांनी वेगवेगळी दोन पथके तयार केली. शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी कैलास पावरा हा कसत असलेल्या वनजमिनीवर शनिवारी दुपारनंतर छापा टाकला. या ठिकाणाहून सुमारे ११ हजार किलो वजनाची गांजाची झाडे काढण्यात आली. त्यांची किमत सुमारे दोन कोटी २० लाख रुपये आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात कैलास पावराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या आदेशावरून पथकाने केली. कारवाई करणाऱ्या पथकात सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सुनील वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलींद पवार, कैलास जाधव, पवन गवळी,अनिल चौधरी, आरीफ पठाण, मनोज नेरकर, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी,चालक सतीश पवार, सागर कासार यांचा समावेश होता.