नाशिक : मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री एलपीजी गॅसच्या टँकरला झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा मृत्यू झाला. यावेळी एलपीजी गॅसची गळती सुरू झाल्यामुळे रात्रीपासून महामार्गावरील या भागातील वाहतूक बंद करून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली. मंगळवारी दिवसभर गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातग्रस्त टँकरमध्ये १८ हजार किलो (१८ मेट्रिक टन) एलपीजी गॅस आहे.
चांदवड तालुक्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता एलपीजी गॅसचा टँकर अपघातग्रस्त झाला. रविवारी या घाटात ट्रेलरचा अपघात झाला होता. अवजड ट्रेलर हटविण्यासाठी मोठ्या क्षमतेची क्रेन मागविण्यात आली होती. रात्री ट्रेलर हटविण्याचे काम सुरू असताना गॅस टँकर त्यावर धडकला. अपघातानंतर टँकरमधून एलपीजी गॅसची गळती सुरू झाली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद केली. अपघातात चालक कृष्णा चौबे (५०) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभर गॅस गळती रोखण्यासाठी बीपीसीएल कंपनीच्या पथकाचे प्रयत्न सुरू होते.
अपघातगस्त एलपीजी टँकर बीपीसीएल कंपनीचा आहे. टँकरमधील गळतीची माहिती मिळताच रात्रीच कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. टँकरमध्ये तब्बल १८ हजार किलो (१८ मेट्रिक टन) एलपीजी गॅस आहे. काही दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेत पथकाने नियोजन केले. गळती रोखणे अवघड असल्याने घटनास्थळी दुसरा रिक्त टँकर मागविण्यात आला. अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅसची पुर्नप्राप्तीचे काम सुरू झाले. या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये टप्प्याटप्प्याने भरला जात आहे.
कंपनीत टँकरमध्ये गॅस भरणे आणि बाहेर एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरणे यात फरक असतो. याद्वारे अधिकतम सात ते आठ हजार किलो एलपीजी पुर्नप्राप्त करता येईल. हे काम टप्प्याटप्प्याने काळजीपूर्वक करावे लागते. त्यास आणखी काही तास लागणार आहेत. उर्वरित नऊ ते १० हजार किलो गॅस हवेत सोडून द्यावा लागणार असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आल्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर आणि ट्रेलर हटविण्याचे काम सुरू होईल. हे पाहता महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास बुधवारची दुपार होऊ शकते, असा अंदाज आहे.
वाहतूक मार्गात बदल
महामार्गावरील चांदवड -मालेगाव या मार्गावरील वाहतूक चांदवड-मनमाड-मालेगाव अशी तर मालेगाव-चांदवड दरम्यानची वाहतूक मालेगाव – मनमाड – चांदवड आणि मालेगाव – देवळा – सोग्रस फाटा अशी वळविण्यात आल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे.